सचिन सावतांचा आक्षेप
राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे, अशी भूमिका सचिन सावंत यांनी घेतली आहे. सचिन सावंत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
सचिन सावंत यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत काय?
कधी कधी लोकांना मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये विशेषता मुंबई आणि ठाणे मधून गुजराती आणि राजस्थानी लोकांना इथून काढल्यास तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत.मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते आर्थिक राजधानी म्हटलं जाणार नाही, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. आता राज्यपालांच्या मुंबई आणि ठाणेसंदर्भातील वक्तव्यावर राज्यातील राजकीय पक्ष काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि मनसे काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. महाराष्ट्राच्या राजभवनाकडून या वादावर काय स्पष्टीकरण देण्यात येणार किंवा कोणती भूमिका मांडली जाईल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नामकरण सोहळ्याला कोण कोण उपस्थित?
अंधेरी येथील चौकाच्या नामकरण सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या भाषणात राज्यपालांनी राजस्थानी समाजाच्या दातृत्वाचे कौतुक केले. राजस्थानी मारवाडी समाजाने व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय न करता शाळा, महाविद्यालये, इस्पितळे बांधली व गोरगरिबांची सेवा केली. राजस्थानी मारवाडी समाज देशात सर्वत्र तसेच नेपाळ, मॉरिशस आदी देशांमध्ये देखील आहे असे सांगून जेथे जेथे हा समाज जातो तेथे तो आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरूप होतो असे राज्यपालांनी सांगितले.
भारत देश हा शूरवीरांच्या बलिदानामुळे तसेच दानशूर लोकांच्या दातृत्वामुळे मोठा आहे असे सांगताना त्याग, बलिदान व सेवा यामुळेच जनतेचे प्रेम मिळते आणि म्हणून सर्वांनी समाजासाठी आपले योगदान दिले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.