विमानाला आग लागताच वैमानिक ते रहिवासी भाग नसलेल्या परिसरात घेऊन गेले, अशी माहिती स्थानिकांनी दिली. विमान गावावर कोसळलं असतं तर प्रचंड मोठी जीवितहानी झाली असती. गावाची लोकसंख्या ३ हजारांच्या घरात असल्यानं खूप मोठं नुकसान झालं असतं. मात्र वैमानिकांनी समयसूचकता दाखवत जीवितहानी टाळली.
पेट घेतल्यानंतर विमानानं आकाशात दोन-तीन घिरट्या घातल्या. बहुधा वैमानिकांनी गावाचा अंदाज घेतला. त्यानंतर त्यांनी विमान गावाच्या बाहेरच्या दिशेला वळवलं. विमान गावावर कोसळलं असतं तर खूप मोठं नुकसान झालं असतं, असं ग्रामस्थ चंद्र प्रकाश यांनी सांगितलं.
कुटुंबासोबत जेवत असताना विमान दृष्टीस पडल्याचं माजी सैनिक असलेल्या संपत राज यांनी सांगितलं. विमानाला आग लागल्याचं स्पष्ट दिसत होतं. पुढच्या काही मिनिटांमध्ये ते गावाबाहेर कोसळलं. काही ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वैमानिकांना वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र आग वाढल्यानं त्यांचे प्रयत्न तोकडे पडले, असा घटनाक्रम राज यांनी सांगितला.