मुंबई: मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराती समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. कोश्यारींच्या विधानाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी कडक शब्दांत समाचार घेतला आहे. मराठी माणसाला डिवचू नका, असा थेट इशारा राज यांनी दिला आहे.

आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूद्ध बोलायला लोक कचरतात. परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का?, असे प्रश्न राज ठाकरेंनी विचारले आहेत.

उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो, अशा शब्दांत राज यांनी कोश्यारी यांना थेट आणि स्पष्ट इशारा दिला आहे.

राज्यपाल काय म्हणाले होते?
कधी कधी लोकांना मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये विशेषत: मुंबई आणि ठाणेमधून गुजराती आणि राजस्थानी लोकांना इथून काढल्यास तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते आर्थिक राजधानी म्हटलं जाणार नाही, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
राज्यपालांनी मांडलेला ‘सिद्धांत’ ऐकून आश्चर्य वाटलं नाही; रोहित पवार असं का म्हणाले?
शिवसेनेकडून समाचार
“राज्यपाल हे राज्याचे पालक असतात. अन पालकाने राज्याप्रती पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन किंवा आकस बुद्धी न ठेवता ममत्ने राज्याचे संगोपन करणे ही संविधानिक जबाबदारी आहे. परंतु महामहीम कोश्यारीजी यांच्याकडून इतक्याही जास्त अपेक्षा ठेवू नयेत. कारण राज्यापेक्षाही भाजप सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर अधिक आहे. चला महाराष्ट्र धर्म वाचवण्याची, जपण्याची आणि वाढवण्याची ही मुंबई वाचवण्याची जबाबदारी आपण महाराष्ट्राची भावंडे मिळून घेऊया” असा टोला सुषमा अंधारे यांनी भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here