Bhagat singh Koshyari explanation | कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला (Mumbai) जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले होते.

 

Koshyari Explanation
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

हायलाइट्स:

  • मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता
  • केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो
  • मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले
मुंबई: गुजराथी आणि मारवाडी लोक निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, अशा आशयाचे वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना अखेर उपरती झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांच्या या वक्तव्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाचं योगदान सर्वाधिक आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली याचा मला अभिमान वाटतो, असे राज्यपालांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. राज्यपालांच्या या स्पष्टीकरणानंतर तरी हा वाद शांत होणार का, हे पाहावे लागेल.
नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये, गुजरातींची तळी उचलण्यावरुन मनसेचा भडका
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काय स्पष्टीकरण दिलं?

“मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला.

काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही.
मराठी माणसाला डिवचू नका! राज्यपालांचा समाचार; राज ठाकरेंनी ‘कोश्यारींची होशियारी’ काढली
पण नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी नमूद केले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here