अहमदनगर महापालिकेतील काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला आहे. यानंतर आता शेजारीच असलेल्या भिंगार कॅन्टोन्मेंटमधील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला साथ दिली आहे. त्यामुळे या भागात शिंदे गटाचे राजकीय वजन वाढताना दिसत आहे. भिंगारचे शिवसेनेचे भिंगार शहर प्रमुख प्रकाश फुलारी यांच्यासह छावणी मंडळाचे माजी नगरसेवक सुनील लालबोंद्रे, संजय छजलानी आणि रवींद्र लालबोंद्रे यांच्यासह कार्यकर्त्यांनी गुरूवारी रात्री मुंबईत शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत नगर शहर शिवसेनेचे माजी प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे, माजी नगरसेवक सचिन जाधव, काका शेळके हेही होते.
भिंगार कॅन्टोन्मेंटच्या सदस्यांची मुदत सध्या संपलेली आहे. तेथे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे मिळून सात नगरसेवक होते. त्यापैकी तीन माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्याने भिंगारमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात येते. आणखी काही नगरसेवक व पदाधिकारी आपल्या संपर्कात असल्याचा दावा नगर शहरातील शिंदे गटाकडून केला जात आहे.
दरम्यान, कोणी नगरसेवक शिंदे गटात गेला तर आणि हा खेळ थांबला नाही तर मुख्यमंत्री शिंदे यांना काळे फासण्याचा इशारा देणाऱ्या स्मिता आष्टेकर भिंगारच्याच आहेत. त्या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत. नगर शहरातील पदाधिकारी आणि नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करीत असताना आष्टेकर यांनी हा इशारा दिला होता. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांना जाब विचारू असा इशाराही त्यांनी दिला होता. आता त्यांच्याच भिंगार शहरात ही फूट पडली आहे. त्यामुळे आष्टेकर काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे त्यांच्या इशाऱ्यानंतर जाणीवपूर्वक हे प्रवेश घडवून आणण्याचेही सांगितले जात आहे.