मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. अशातच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करुन राज्यपालांवर आगपाखड केली आहे. राज्यपाल हटाओचा अप्रत्यक्ष नारा देत महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी काय म्हटलं?

संभाजीराजे म्हणाले, “विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथवा मुंबईबद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत”

“त्यामुळे, देशाच्या राष्ट्रपती महोदया व पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा”.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक बाहेर गेले, तर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही”, असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेसह सर्वच विरोधकांनी राज्यपालांवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपने देखील राज्यपालांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली आहे. राज्यापालांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहेत.

Bhagat singh Koshyari: राज्यपालांनी महाराष्ट्राची चांगली बाजू पाहिली, आता कोल्हापूरी जोडा दाखवायची वेळ आलेय: ठाकरे
भगतसिंह कोश्यारी यांनी आतापर्यंत महाराष्ट्राची चांगली बाजू पाहिली आहे. पण त्यांना आता कोल्हापूरी जोडा दाखवायची वेळ आली आहे. माझ्या या वक्तव्याचा अर्थ कोणी काढायचाय तसा काढावा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गेल्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्रात राहून सगळं काही ओरपलेलं आहे, अंगत-पंगत सगळा मानमरातब ओरबाडला आहे. आता ते महाराष्ट्रात राहूनच मराठी माणसाचा अपमान करत आहेत. मला वाटतं, त्यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्राची संस्कॉती, सुंदर लेण्या, डोंगर-खोरी, शिवरायांचे किल्ले आणि महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ, अशा सगळ्या चांगल्या गोष्टी पाहिल्या असतील. म्हणजे त्यांनी, ‘महाराष्ट्र का घी देखा, लेकिन कोल्हापूर का जोडा नही देखा’. त्यामुळे आता राज्यपाल महोदयांना कोणीतरी कोल्हापूरचा जोडा दाखवायची वेळ आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here