संजय राऊत यांना ईडीने काही दिवसांपूर्वीच चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले होते. पण संजय राऊत दिल्लीत असल्याने ते ईडी कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी बुधवारी वकिलांमार्फत संपर्क साधून चौकशीला उपस्थित राहण्यासाठी ७ ऑगस्टपर्यंत वेळ मागितला होता. पण ईडीने त्यांची मागणी फेटाळत त्यांना नवीन समन्स दिले होते. त्यानुसार आता संजय राऊत यांना २७ जुलैला ईडी कार्यालयात उपस्थित राहायला सांगितले होते. पण संजय राऊत तेव्हाही चौकशीला हजर राहिले नव्हते. त्यामुळे आता ईडी थेट राऊत यांच्या घरीच पोहोचली आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, हे पाहावे लागेल.
नेमकं काय आहे प्रकरण?
‘ईडी’ने पत्राचाळ प्रकरणात २ फेब्रुवारी रोजी खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणाऱ्या प्रवीण राऊत यांना अटक केली होते. ते गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. ही हाऊसिंग डेव्हलपमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरची (एचडीआयएल) उपकंपनी आहे. या कंपनीने म्हाडाच्या जमिनीवर वसलेल्या पत्राचाळीचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडासोबत करार केला होता. ही चाळ तब्बल ४७ एकरावर वसली असून, तेथे ६२७ भाडेकरू आहेत. या सर्वांसाठी घरे बांधून ती म्हाडाला दिली जावी, असा करार सन २०१०मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर प्रवीण राऊत यांनी एचडीआयएलचे राकेश वाधवान, सारंग वाधवान व अन्य संचालकांना हाताशी घेत या चाळ पुनर्विकासापोटी मिळणाऱ्या चटई क्षेत्र निर्देशांकाची (एफएसआय) परस्पर अन्य बांधकाम विकासकांना विक्री केली. तसंच याद्वारे त्यांनी बेकायदा तब्बल १०७४ कोटी रुपये जमवले. पण त्याचवेळी पत्राचाळीचा मात्र एक इंचदेखील पुनर्विकास केला नाही. त्याखेरीज याआधारे त्यांनी बँकेतूनही ९५ कोटी रुपयांचे कर्ज मिळवले व त्या रकमेचा गैरवापर केला, असा आरोप आहे.