रत्नागिरीत करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी करोनाच्या ५ नवीन रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात करोनाचे एकूण सहा अहवाल प्राप्त झाले होते त्यातील ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह निघाले आहेत. चार अहवाल कळंबणीतील उपजिल्हा रुग्णालायतून पाठवण्यात आलेल्या स्वॅबचे आहेत तर एक अहवाल रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातून पाठवण्यात आलेल्या स्वॅबचा आहे. अन्य एक अहवाल निगेटिव्ह आढळला आहे. आता जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८२वर जाऊन पोहचली आहे.
सिंधुदुर्गात ८ रुग्ण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाधित रुग्णांची ८ वर पोहचली आहे. सोमवारी ११ मे रोजी जिल्ह्यातील पाचवा रुग्ण तालुक्यामध्ये सापडला होता. त्याच्या संपर्कातील दोन महिला ठरल्या आहेत. तालुक्यातील नेरूर येथे २३ वर्षांचा तरुण आंबा वाहतूक करणारा असून त्याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या आठ झाली असून चार रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. उर्वरित ४ रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आजवर सापडलेल्या आठही रुग्णांचे मुंबई कनेक्शन आहे. गुरुवारी सापडलेल्या रुग्णांत ५१ वर्षीय महिला होती. तिच्या निकटच्या दोन महिलांना करोनाने गाठले आहे. नेरूर येथीलम तेवीस वर्षीय युवक ६ मे रोजी वाशीहून गावी आला होता. त्याला गावातील शाळा इमारतीत अलगीकरणात ठेवले होते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला आता जिल्हा रुग्णालयात अलगीकरणात ठेवले आहे.
शाळांमध्ये सुविधांचा अभाव
जिल्ह्यात सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे आणि मुंबईकर मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल होत आहेत. मुंबईहून आलेल्या व्यक्तींना वेगवेगळ्या शाळा- महाविद्यालयाच्या इमारतींत अलगीकरण करण्यात आले आहे पण प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. खेड्यातील शाळांमधून आवश्यक त्या सुविधा नसल्यामुळे अलगीकरणात ठेवलेल्यांची नाराजी दिसून येत आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी मोठ्या हिमतीने परिस्थितीचा सामना करत असल्या तरी एकूण मुंबईकरांचे येणारे लोंढे पाहता परिस्थिती हाताळणे कठीण होत आहे.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines