ईडीच्या या कारवाईबद्दल नितेश राणे यांनी आनंद व्यक्त केला आहे. पत्राचाळमध्ये जे गरीब रहिवासी होते, गरीब मराठी कुटुंबीय होते, त्यांना आज खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. संजय राऊत स्वत:ला खूप मोठे समजायचे, झुकेगा नय, असे डायलॉग मारायचे. आता त्यांना जाऊन विचारा, असे नितेश राणे यांनी म्हटले.
संजय राऊत यांच्या घरावर ईडीने धाड टाकल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाचे नेते त्यांच्यावर तुटून पडले आहेत. शिंदे गटाचे बंडखोर आमदार भरत गोगावले यांनीही आता संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी चौकशीला जायला पाहिजे होते. ते चौकशीला गेले नाहीत म्हणून ईडी त्यांच्या घरी गेली, असे भरत गोगावले यांनी म्हटले.
प्राथमिक माहितीनुसार, ईडीचे पथक सकाळी सात वाजता संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्यावर दाखल झाले. याठिकाणी आल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडतीला सुरुवात केली आहे. सध्या ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे ताब्यात घेतली जात असल्याचे समजते. तसेच ईडीचे अधिकारी सध्या संजय राऊत यांची चौकशी करत आहेत. याप्रकरणात संजय राऊत यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे.
राऊतांचा मुक्काम मलिकांच्या शेजारी व्हावा: किरीट सोमय्या
संजय राऊत यांच्या घरी ईडीची धाड पडल्यानंतर किरीट सोमय्या यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राऊत यांनी भ्रष्टाचार, लूटमार, माफियागिरी केली. आता या सगळ्याचा हिशोब त्यांना द्यावा लागेल. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राऊत यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. ते राऊत यांचे पार्टनर झाले होते. मात्र आता राऊत यांना हिशोब द्यावा लागेल. राऊत यांचा मुक्काम नवाब मलिकांच्या शेजारी असावा, ही माझी प्रार्थना आणि इच्छा असल्याचं सोमय्या म्हणाले.