मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची धाड पडली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचं पथक काही वेळापूर्वीच संजय राऊतांच्या मुंबईतील घरी सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेसह दाखल झालं आहे. ईडीनं यापूर्वी संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणं टाळलं होतं. त्यामुळे आता ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत.

सकाळी सातच्या सुमारास ईडीचे अधिकारी राऊतांच्या बंगल्यावर पोहोचले. संजय राऊत भांडूपमध्ये राहतात. ईडीचे अधिकारी राऊत यांच्या घरी दाखल झाले, त्यावेळी संजय राऊत, त्यांच्या पत्नी वर्षा राऊत, बंधू सुनिल राऊत घरात होते. सध्या ईडीचे अधिकारी राऊतांच्या घराची झाडाझडती घेत आहेत. राऊत यांच्या घरावर छापा पडल्याची माहिती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना समजताच शिवसैनिक मोठ्या संख्येनं राऊत यांच्या घराबाहेर जमले. त्यांनी ईडी आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
राऊतांचा मुक्काम मलिकांच्या शेजारी व्हावा ही तर सोमय्यांची इच्छा; ईडी अटकेची कारवाई करणार?
ईडीच्या अधिकाऱ्यांकडून राऊत यांच्या घराची झाडाझडती सुरू असताना आमदार सुनिल राऊत काही वेळासाठी खिडकीत आले. त्यांच्या देहबोलीतून ते निर्धास्त असल्याचं दिसत होतं. सध्या कागदपत्रांची झाडाझडती सुरू असल्याचं त्यांनी हातवारे करून सांगितलं. थोड्या वेळानं मी खाली येईन, असं त्यांनी खाणाखुणांच्या माध्यमातून सांगितलं. दोन्ही हातांची बोटं दाखवत राऊत यांनी एकूण १० अधिकारी घरात असल्याचं सांगितलं.
ED: मोठी बातमी: संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल, झाडाझडतीला सुरुवात
संजय राऊत यांना ईडीने काही दिवसांपूर्वीच चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले होते. पण संजय राऊत दिल्लीत असल्याने ते ईडी कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी बुधवारी वकिलांमार्फत संपर्क साधून चौकशीला उपस्थित राहण्यासाठी ७ ऑगस्टपर्यंत वेळ मागितला होता. पण ईडीने त्यांची मागणी फेटाळत त्यांना नवीन समन्स दिले होते. त्यानुसार आता संजय राऊत यांना २७ जुलैला ईडी कार्यालयात उपस्थित राहायला सांगितले होते. पण संजय राऊत तेव्हाही चौकशीला हजर राहिले नव्हते. त्यामुळे आता ईडी थेट राऊत यांच्या घरीच पोहोचली आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, हे पाहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here