म. टा. वृत्तसेवा, अलिबाग
परप्रांतीय श्रमिकांची मुंबईतून त्यांच्या राज्यांत जाण्याची सोय करण्यात आल्यानंतर सरकार आपल्या मदतीला धावून येईल या आशेवर असलेल्या कोकणातील चाकरमान्यांसह राज्यातील इतर भागांतील अडकलेल्यांचा आता धीर सुटू लागला आहे. प्रवासाची कोणतीच व्यवस्था होत नसल्याचे पाहून चाकरमान्यांनी गावाकडे पायी प्रवास सुरू केला आहे. मात्र, त्यामुळे काहींचा जीव जाऊ लागला आहे. गुरुवारी मुंबई-गोवा महामार्गावरून गावाकडे चालत निघालेल्या आणखी एका व्यक्तीचा भर उन्हात मृत्यू झाला. रायगडमध्ये आत्तापर्यंत असे तिघे मृत्युमुखी पडले आहेत.
मोतीराम जाधव (४३) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते श्रीवर्धन तालुक्यातील आडगाव येथील रहिवाशी होते. कुटुंबातील सात माणसांसह ते कांदिवली येथून श्रीवर्धनकडे निघाले होते. उन्हाच्या तीव्र झळा सहन करत कुटुंबीयांसह खारपडापर्यंत आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि रस्त्यावर कोसळून त्यांचा मृत्यू झाला. लॉकडाउनच्या काळात झालेला रायगड जिल्ह्यातील हा तिसरा मृत्यू असून यापूर्वी महाड येथील एका चाकरमानीचा आणि श्रीवर्धन तालुक्याच्या मारळ येथील एका महिलेचा माणगाव येथे मृत्यू झाला होता.
गावी परतण्यासाठी काही व्यवस्था नसल्याने कोकणात पायी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन त्यांची सरकारने प्रवासाची सोय करावी, अशी मागणी महाडचे काँग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप तसेच अलिबागचे वकील प्रवीण ठाकूर यांनी केली होती. रायगडमधील श्रमिक वा प्रवाशी रस्त्याने किंवा रेल्वेमार्गावरून चालत जाणार नाही याची खबरदारी घेऊन त्यांच्या प्रवासाची सोय करण्यात यावी, असे आदेश रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारीच काढले होते.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines