मुंबई: रफीसाहेबांना जाऊन यंदाच्या ३१ जुलैला तब्बल ४२ वर्षं पूर्ण होतील. चार पिढ्या बदलल्या, चित्रपट, गाणी, संगीत सगळं बदललं; पण चाहत्यांच्या दुनियेत रफीसाहेबांची जादू कायम आहे. कुणी लेखणीतून, गाण्यातून तर कुणी चित्रातून रफीसाहेबांचं स्मरणं सातत्यानं करत असतात. चित्रकार विजय पेडणेकर हे त्यापैकीच एक. रफीसाहेबांचे निस्सीम चाहते. गेल्या पाच वर्षांपासून दरवर्षी रफीसाहेबांच्या स्मृतीदिनी ते एक डिजिटल पोर्टेट करत आहेत.

पेडणेकर हे मुळचे कोकणातील वेंगुर्ल्याचे. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण गुजरातला अहमदाबादमध्ये झालं. तिथेच अप्लाइड आर्टमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. १९८०च्या सुमारास मुंबईत आले. कॉलेज जीवनापासूनच रफीसाहेबांच्या गाण्यांचे भक्त. रेडिओ, एलपी, कॅसेट ते सीडीपर्यंत रफीसाहेबांची गाणी कायम सोबत राहिली. थिएटरमध्ये एखादा चित्रपट पाहायला गेले आणि सिनेमा वाईट असला तरी पेडणेकर डोक्याला फार ताप करून घेत नसत. चित्रपटातली रफीसाहेबांची गाणी म्हणजे आपला पैसा वसूल असं मानणाऱ्या चाहत्यांपैकी ते एक.
राज्यपाल असं का म्हणाले हे मला… अभिनेते सचिन पिळगावकर स्पष्टच बोलले
रफीसाहेबांच्या हिंदी, मराठी प्रेमगीतांपासून उडती गाणी ते भक्तीगीते, भजन, गझलपर्यंतची शेकडो गाणी पेडणेकरांना मुखोद्गत आहेत. चित्रपटाचे नाव घेतले की त्यातली रफीसाहेबांची दोन-चार गाणी पेडणेकरांच्या तोंडून हमखास ऐकायला मिळणार. सुख-दु:खात रफीसाहेबांची साथ कायम राहिली. कधी एखाद्या प्रसंगात निराशा आली तर रफीसाहेबांची गाणी हा त्यावरचा उतारा ठरला, असे पेडणेकर सांगतात. रफीसाहेबांची आठवण म्हणून गेल्या पाच वर्षांपासून ते दरवर्षी त्यांचे एक पोर्टेट करतात. या निमित्तानं रफीसाहेब कायम आपल्याबरोबर आहेत याची आठवण राहते, असे त्यांनी सांगितले.
भूमिका निवडताना नेमकं काय पाहते? अमृता सुभाष म्हणते..
अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, प्राण, शशी कपूर, स्मिता पाटील, हेमा मालिनी यांच्यासह विविध कलावंतांची पोर्टेट पेडणेकर यांनी केली आहेत. अनेक कलाकारांच्या सह्या त्यावर घेतल्या आहेत. २६ जुलै २००५च्या पावसात घरात तीन फुटांहून पाणी शिरले. विक्रोळी, टागोरनगरला तळ मजल्यावर असलेल्या या घरात पेडणेकर यांचा गेल्या पाच दशकांपासून जीवापाड जपलेला चित्रखजिना पाण्याखाली गेला. त्यांनी मुंबई महापालिकेच्या कॅलेंडरसाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम केलं आहे. पालिकेनं मुंबई शहरातील जुने रस्ते, रेल्वे स्थानकं, ऐतिहासिक ठिकाणे, हेरिटेज वास्तू यावर अभ्यासपूर्ण कॅलेंडर बनवली आहेत. त्यात पेडणेकर यांचंही महत्त्वाचं योगदान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here