एकीकडे अजित पवार ईडीच्या कारवाईचा निषेध करत नसताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे आमदार अमोल मिटकरींनी भाजपवर सडकून टीका केली. संजय राऊत यांच्या घरावर ईडीनं धाड टाकल्यानं शिंदे गटातील काहींच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. भाजपनं ईडीचा धाक दाखवूनच त्यांना स्वत:कडे ओढून घेतलं. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे कडवे शिवसैनिक असलेले संजय राऊत ईडीपुढे झुकले नाहीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.
ईडीच्या कारवायांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी अनेक नेते भाजपसोबत गेले. शिवसेनेचे आमदार फुटले. मात्र या संकट काळातही राऊत पक्षासोबत राहिले. त्यांनी पक्ष नेतृत्त्वाची साथ सोडली नाही. ही बाब महाराष्ट्र विसरणार नाही. राऊतांनी ईडीसमोर गुडघे टेकले नाहीत. अनेक आमदार पक्ष सोडून गेले असतानाही राऊत यांनी एकहाती किल्ला लढवला, याची दखल इतिहासात घेतली जाईल, असं मिटकरी म्हणाले.
राऊतांच्या घरावर धाड पडली असताना अमोल मिटकरी यांनी एक वेगळाच योगायोग सांगितला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबद्दल, मराठी माणसाबद्दल केलेल्या विधानावरून प्रचंड गदारोळ झाला. राज्यपालांविरोधात वातावरण तापलं. त्यांच्यावर असलेला रोष कमी व्हावा, लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधलं जावं यासाठी ईडीनं सकाळी राऊतांच्या घरावर धाड टाकली, याकडे मिटकरींनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.