आम्हाला कोणालाही दबाव टाकून पक्षात घ्यायचं नाही. त्यामुळे तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागला आहे म्हणून कोणीही भाजप आणि आमच्याकडे येऊ नका. पुण्याचं काम करू नका, असा टोला शिंदे यांनी अर्जुन खोतकर यांना लगावला. अर्जुन खोतकर असू द्या किंवा मग अन्य कोणी असू द्या, तपास यंत्रणा मागे लागल्या आहेत म्हणून दडपणाखाली येऊन कोणीही आमच्याकडे, भाजपमध्ये येऊ नका, असं शिंदे म्हणाले.
काय म्हणाले होते अर्जुन खोतकर?
शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. ते गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर आहे. परिस्थितीनुसार आपण शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेत आहोत. यासाठी मी उद्धव ठाकरेंची परवानगी घेतली. अडचणीत असाल तर जा. पक्षप्रमुख म्हणून सहकाऱ्याला सेफ करणं गरजेचं असल्याचं ठाकरेंनी आपल्याला फोनवर सांगितलं, असं खोतकर म्हणाले. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
शिंदे गटात गेलेले अनेक आमदार उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत. मात्र तुम्ही खूप भावुक झालेले दिसता, त्याचं कारण काय असा प्रश्न पत्रकारांनी खोतकरांना विचारला. त्यावर ४० वर्षे ज्या पक्षात काम केलं त्या पक्षाविरोधात कसं बोलायचं, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. कोणीच कोणाचं वस्त्रहरण करू नये, असं आवाहन त्यांनी केलं. या पत्रकार परिषदेत खोतकरांना गहिवरलेले दिसले.