मुंबई : तब्बल साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत यांच्या भांडूपमधील घरुन त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं असून त्यांना ईडी कार्यालयात नेलं जाणार आहे. तिथे त्यांची आणखी चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. शेकडो शिवसैनिकांनी ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत राऊतांवरील कारवाईचा निषेध व्यक्त केला. दुसरीकडे मुंबईतील ईडीच्या ऑफिसबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ऑफिसबाहेर बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे.

कथित पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊत यांची आज सकाळी सकाळी सात वाजल्यापासून त्यांच्या भांडूप येथील मैत्री निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. ईडीचे अधिकारी दारात आल्यानंतर संजय राऊतांनी त्यांना घरी येण्याचं कारण विचारलं. संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर मी चौकशीला येतो, असं सांगूनही तुम्ही आज येण्याचं कारण काय?, असा सवाल त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर अधिकाऱ्यांनी राऊतांना छापेमारीचं कारण सांगितलं. तुम्ही ईडीला सहकार्य करत नसल्याने आज आम्ही चौकशीसाठी आलो आहोत, असं उत्तर ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलं. दरम्यान संजय राऊत आणि ईडीच्या अधिकाऱ्यांमध्ये सुमारे अर्धा तास तू तू मैं मैं झालं. अखेर ईडीचे अधिकारी राऊतांच्या घरात पोहोचले अन् चौकशीला सुरुवात केली.

काही वेळापूर्वीच ईडीचे दिल्लीतील केंद्रीय अधिकारी हे मुंबईत दाखल झाले आहेत. हे अधिकारी ईडीच्या बॅलर्ड पिअर येथील कार्यालयात आहेत. आता संजय राऊत यांना याठिकाणी चौकशीसाठी आणलं जाणार आहे.त्यानंतर ईडीचे वरिष्ठ अधिकारी संजय राऊत यांची चौकशी करु शकतात. या पार्श्वभूमीवर सध्या ईडीच्या कार्यालयाबाहेरील बंदोबस्त वाढवला जात आहे. ईडीच्या कार्यालयाकडे येणारे काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. याठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. संजय राऊत यांना ईडीच्या कार्यालयात आणल्यास याठिकाणी शिवसैनिकांची मोठी गर्दी होऊ शकते. त्यामुळे एखादा अनुचित प्रकार घडू शकतो. यादृष्टीने ईडीच्या कार्यालयाबाहेरील बंदोबस्त वाढवला जात आहे. मात्र, या सगळ्याची एकूण दिशा पाहता ईडीकडून संजय राऊत यांना अटक केली जाऊ शकते.

दिल्लीतील अधिकारी मुंबईत दाखल, ED कार्यालयाभोवती बॅरिकेडिंग; राऊतांच्या अटकेची दाट शक्यता

सकाळी ७ वाजता नेमकं काय घडलं?

आज सकाळी सात वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक संजय राऊत यांच्या भांडूप परिसरातील मैत्री बंगल्यावर धडकले. यावेळी ईडीच्या पथकासोबत सीआरपीएफचा कडेकोट बंदोबस्त होता. प्राथमिक माहितीनुसार, ईडीच्या या पथकात १० अधिकाऱ्यांचा समावेश होता. यापैकी काही अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली. तर उर्वरित अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांची चौकशी केली. संजय राऊत यांच्या घरावर ईडीची धाड पडल्यानंतर काही वेळातच भांडूप परिसरात त्यांच्या बंगल्याबाहेर शिवसैनिकांची गर्दी जमायला सुरुवात झाली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करुन कारवाईचा निषेध केला.

Sanjay Raut: ईडीने घरावर धाड टाकली, पण संजय राऊतांचा ‘झुकेगा नय’ बाणा कायम; ट्विट करून म्हणाले…
राऊतांचा ‘झुकेगा नहीं’चा नारा

चौकशी सुरु असतानाही संजय राऊत यांचे मनोबल थोडेही खच्ची झाल्याचे दिसत नाही. कारण, ही चौकशी सुरु असतानाच संजय राऊत यांनी काही ट्विटस केली. या ट्विटसमध्ये संजय राऊत यांनी, ‘खोटी कारवाई..खोटे पुरावे. मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही. जय महाराष्ट्र, असे म्हटले आहे. राऊतांच्या या एकूण ट्विटसचा सूर पाहता संजय राऊत हे ईडीसमोर सहजासहजी शरण जातील, असे दिसत नाही.

संजय राऊत ट्विटसमध्ये आणखी काय म्हणाले?

कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन. मरेन पण शरण जाणार नाही. मी शिवसेना सोडणार नाही. महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील, असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here