मुंबई: शिवसेना नेते खासदार संजय राऊत ९ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या घराबाहेर आले. यावेळी त्यांना समर्थन देण्यासाठी हजारो शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली होती. “संजय राऊत तुम आगे बढो-हम तुम्हारे साथ हैं…डरेंगे नही-लढेंगे, आव्वाज कुणाचा शिवसेनेचा…” अशा जोरदार घोषणांनी राऊतांच्या मैत्री बंगल्याचा परिसर दणाणून गेला होता. शिवसैनिकांच्या जोरदार घोषणेने राऊतांच्या अंगातही उत्साह संचारला. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत घराबाहेर येताना गळ्यात भगवं उपरणं घातलं होतं. शिवसैनिकांचं समर्थन पाहून राऊतांनी आपले दोन्ही हात उंचावून, शिवसैनिकांना अभिवादन केलं. आपल्या गळ्यातील भगवं उपरणं हवेत फडकावून भगवा नेहमी फडकत राहिन, भगव्याला हरवणं सोपं नाही, असा इशाराच दिला. राऊतांच्या या कृतीनंतर शिवसैनिकांमध्ये जोरदार उत्साह संचारला. शिवसैनिकांनी राऊतांच्या समर्थनार्थ आणि ईडीच्या विरोधात पुन्हा घोषणाबाजी करायला सुरुवात केली. राऊतांनी आपली वज्रमूठ आवळून शिवसेनेसाठी अखेरपर्यंत लढणार असल्याचं माध्यमांना सांगितलं. दुसरीकडे याचवेळी राऊतांचं कुटुंब बंगल्याच्या गॅलरीमधून हा सगळा भावनिक प्रसंग पाहत होतं. राऊतांच्या मातोश्रींच्या डोळ्यात अश्रू होते. तर राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याही डोळ्याच्या कडा अश्रूंनी दाटल्या होत्या. तर तिसरीकडे ज्याप्रकरणी राऊतांवर ईडीने कारवाई केलीये, त्या पत्राचाळ प्रकरणाचा एकही कागद आमच्या घरात सापडला नाही, असं राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत ठासून सांगत होते. असं असलं तरी सुनील राऊतांच्या आरोपांचं ईडीच्या अधिकाऱ्यांनी खंडन केलं. आमचा गृहपाठ पक्का आहे. आमच्याकडे पुरावे आहेत, असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

तब्बल साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत यांच्या भांडूपमधील घरुन त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं असून त्यांना ईडी कार्यालयात नेलं जाणार आहे. तिथे त्यांची आणखी चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबईतील ईडीच्या ऑफिसबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ऑफिसबाहेर बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे.

संजय राऊत अखेर ईडीच्या ताब्यात, ९ तासांच्या चौकशीनंतर कारवाई, राऊत-ईडी अधिकाऱ्यांमध्ये तू तू मैं मैं

कथित पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊत यांची आज सकाळी सकाळी सात वाजल्यापासून त्यांच्या भांडूप येथील मैत्री निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. ईडीचे अधिकारी दारात आल्यानंतर संजय राऊतांनी त्यांना घरी येण्याचं कारण विचारलं. संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर मी चौकशीला येतो, असं सांगूनही तुम्ही आज येण्याचं कारण काय?, असा सवाल त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर अधिकाऱ्यांनी राऊतांना छापेमारीचं कारण सांगितलं. तुम्ही ईडीला सहकार्य करत नसल्याने आज आम्ही चौकशीसाठी आलो आहोत, असं उत्तर ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलं. दरम्यान संजय राऊत आणि ईडीच्या अधिकाऱ्यांमध्ये सुमारे अर्धा तास तू तू मैं मैं झालं. अखेर ईडीचे अधिकारी राऊतांच्या घरात पोहोचले अन् चौकशीला सुरुवात केली.

राऊतांचा ‘झुकेगा नहीं’चा नारा

चौकशी सुरु असतानाही संजय राऊत यांचे मनोबल थोडेही खच्ची झाल्याचे दिसत नाही. कारण, ही चौकशी सुरु असतानाच संजय राऊत यांनी काही ट्विटस केली. या ट्विटसमध्ये संजय राऊत यांनी, ‘खोटी कारवाई..खोटे पुरावे. मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही. जय महाराष्ट्र, असे म्हटले आहे. राऊतांच्या या एकूण ट्विटसचा सूर पाहता संजय राऊत हे ईडीसमोर सहजासहजी शरण जातील, असे दिसत नाही.

संजय राऊत ट्विटसमध्ये आणखी काय म्हणाले?

कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन. मरेन पण शरण जाणार नाही. मी शिवसेना सोडणार नाही. महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील, असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here