मुंबई : “मी उद्धव ठाकरे-बाळासाहेब ठाकरेंचा लढणारा शिवसैनिक आहे. भाजप-ईडीला कधीच शरण जाणार नाही. ईडी मला अटक करु इच्छिते. मी देखील अटक व्हायला निघालोय. भगव्यासाठी शेवटपर्यंत लढेन, अगदी मरेन पण ठाकरेंची साथ कधी सोडणार नाही, असा निर्धार व्यक्त करत ईडीच्या कारवाईला संजय राऊत हसतमुखाने सामोरे गेले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एका बाजूला आत्मविश्वास तर दुसऱ्या बाजूला संतापाची भावना होती. “आप उस व्यक्ती को नहीं हरा सकते.. जो कभी हार नहीं मानता”, असं ट्विट करुन ईडीने कितीही कारवाई केली तरी मी झुकणार नाही. शिवसेनेला त्रास देण्यासाठी अशा प्रकारची दमनशाही सुरु आहे. संजय राऊत ठाकरेंचा शिवसेना पक्ष कधी सोडणार नाही. महाराष्ट्र इतका कमकुवत नाही, शिवसेना कमकुवत नाही, असा आक्रमक पवित्रा घेत राऊतांनी ईडी आणि भाजपला ईडी कार्यालयाबाहेरुन इशारा दिला.

शिवसेनेचे फायरब्रँड नेते, ज्यांनी गेली अडीच वर्ष महाविकास आघाडीची, शिवसेनेची बाजू ठामपणे मांडली, उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवरचा प्रत्येक बाण परतावून लावला, ठाकरेंवरच्या प्रत्येक आरोपाला बिनतोड उत्तर दिलं, त्याच संजय राऊतांना आज कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने आज ताब्यात घेतलं. सुमारे ९ तासांच्या चौकशीनंतर राऊतांना घेऊन ईडीचे अधिकारी मुंबईतील फोर्टच्या ईडी कार्यालयात पोहोचले. तिथे गेल्यानंतर राऊतांनी पुन्हा आक्रमक होऊन माध्यमांना ‘झुकेगा नही’ अंदाजात आपली प्रतिक्रिया दिली.

संजय राऊतांच्या गळ्यात भगवं उपरणं, हात उंचावून शिवसैनिकांना अभिवादन, भगव्यासाठी लढण्याचा निर्धार, कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू

राऊत म्हणाले, “सर्वांना नाहीत आहे माझ्याविरोधात खोटं प्रकरण लावण्यात आलं आहे. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र मी शिवसेना सोडणार नाही आणि महाराष्ट्राशी बेईमानी करणार नाही. ईडी मला अटक करणार आहे. मी अटक करून घेणार आहे”

गळ्यात भगवं उपरणं, दोन्ही हात उंचावून शिवसैनिकांना अभिवादन, झुकेगा नहींचा नारा

शिवसेना नेते खासदार संजय राऊत ९ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या घराबाहेर आले. यावेळी त्यांना समर्थन देण्यासाठी हजारो शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली होती. “संजय राऊत तुम आगे बढो-हम तुम्हारे साथ हैं…डरेंगे नही-लढेंगे, आव्वाज कुणाचा शिवसेनेचा…” अशा जोरदार घोषणांनी राऊतांच्या मैत्री बंगल्याचा परिसर दणाणून गेला होता. शिवसैनिकांच्या जोरदार घोषणेने राऊतांच्या अंगातही उत्साह संचारला. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत घराबाहेर येताना गळ्यात भगवं उपरणं घातलं होतं. शिवसैनिकांचं समर्थन पाहून राऊतांनी आपले दोन्ही हात उंचावून, शिवसैनिकांना अभिवादन केलं. आपल्या गळ्यातील भगवं उपरणं हवेत फडकावून भगवा नेहमी फडकत राहिन, भगव्याला हरवणं सोपं नाही, असा इशाराच दिला. राऊतांच्या या कृतीनंतर शिवसैनिकांमध्ये जोरदार उत्साह संचारला. शिवसैनिकांनी राऊतांच्या समर्थनार्थ आणि ईडीच्या विरोधात पुन्हा घोषणाबाजी करायला सुरुवात केली. राऊतांनी आपली वज्रमूठ आवळून शिवसेनेसाठी अखेरपर्यंत लढणार असल्याचं माध्यमांना सांगितलं. दुसरीकडे याचवेळी राऊतांचं कुटुंब बंगल्याच्या गॅलरीमधून हा सगळा भावनिक प्रसंग पाहत होतं. राऊतांच्या मातोश्रींच्या डोळ्यात अश्रू होते. तर राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याही डोळ्याच्या कडा अश्रूंनी दाटल्या होत्या. तर तिसरीकडे ज्याप्रकरणी राऊतांवर ईडीने कारवाई केलीये, त्या पत्राचाळ प्रकरणाचा एकही कागद आमच्या घरात सापडला नाही, असं राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत ठासून सांगत होते. असं असलं तरी सुनील राऊतांच्या आरोपांचं ईडीच्या अधिकाऱ्यांनी खंडन केलं. आमचा गृहपाठ पक्का आहे. आमच्याकडे पुरावे आहेत, असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here