काही दिवसांपूर्वी करोनामुक्त झालेला रत्नागिरी जिल्हा पुन्हा एकदा करोनाच्या विळख्यात सापडला आहे. चिंतेची बाब म्हणजे मुंबई, ठाणे या करोनासाठी हॉटस्पॉट बनलेल्या भागांतून चाकरमानी कुटुंबकबिल्यासह गाव गाठत असल्याने व त्यात अनेक करोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने प्रशासन हादरलं आहे.
जिल्ह्यात आज करोनाचे आणखी चार रुग्ण आढळले. मिरज येथे पाठवलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी ४ अहवाल प्राप्त झाले असून हे चारही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ३ रुग्ण कामथे येथे तर १ रुग्ण कळंबणी येथे संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये होता. कामथे येथील ३ रुग्ण चिपळूण तालुक्यातील कापरे येथील रहिवासी असून कळंबणी येथील रुग्ण हा संगमेश्वर येथील रहिवासी आहे. या चारही जणांचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ८६ झाली आहे.
दरम्यान, रत्नागिरीत करोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून जिल्ह्यात शुक्रवारी करोनाच्या ५ नवीन रुग्णांची भर पडली होती. त्यात आज आणखी ४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासन हादरलं आहे. जिल्ह्यात चाकरमान्यांचा ओघ असाच सुरू राहिला व रुग्णसंख्या वाढत गेल्यास उपलब्ध आरोग्य सुविधा अपुऱ्या पडणार आहेत. यास्थितीत कोणती पावले उचलायची, असा पेच यंत्रणांपुढे निर्माण झाला आहे.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines