– ‘एनआयए’कडून नांदेड, कोल्हापूरमध्ये छापा

– बेकायदेशीर कृत्ये गुन्ह्यांतर्गत कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेची पाळेमुळे राज्यात खोलवर असल्याचे राष्ट्रीय तपास संस्था अर्थात ‘एनआयए’च्या कारवाईत समोर आले आहे. याप्रकरणी ‘एनआयए’ने रविवारी राज्यातील नांदेड व कोल्हापूरच्या ग्रामीण भागात छापा टाकला. बेकायदेशीर कृत्ये गुन्ह्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली.

देशभरात अनेक ठिकाणी ‘आयएस’ला मदत करणारे संशयित असल्याचे समोर आले होते. त्यानुसार अशा संशयितांविरुद्ध बेकायदेशीर कृत्येविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने केली होती. त्यानुसार ‘एनआयए’ने रविवारी महाराष्ट्रासह सहा राज्यांत छाप्याची कारवाई सुरू केली.

‘एनआयए’तील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी शहरातील रेंदाळा भागात दोन सख्खे भाऊ ‘आयएस’साठी काम करीत असल्याची माहिती ‘एनआयए’ला मिळाली होती. हे दोघेही ‘आयएस’साठी एका फाऊंडेशनच्या नावाखाली निधी जमा करीत होते. तसेच स्थानिक तरुणांनादेखील ‘आयएस’मध्ये जाण्यासाठी त्यांची भरती करीत होते, अशी माहिती होती. त्यानुसार छाप्याद्वारे या दोघांना अटक करण्यात आली. नांदेडमध्येदेखील तपास सुरू आहे.’

‘एनआयए’ने एकाचवेळी मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, कर्नाटक व उत्तर प्रदेशातही ही कारवाई केली. मध्य प्रदेशातील भोपाळ व रायसेन जिल्हा, गुजरातमधील भरुच, सुरत, अहमदाबाद व नवसारी, बिहारमधील अररिया व भटकळ, उत्तर प्रदेशातील देवबंद आणि कर्नाटकमधील तुमकूर सिटी या ठिकाणी कारवाई करण्यात आली. हा तपास आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here