भाजपवर घणाघाती हल्ला
संजय राऊत यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर टीका करताना शिवसेनेनं देशाचा स्वातंत्र्य लढा आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यामधील भाजपशी संबंधित लोकांच्या योगदानावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. ‘संजय राऊत यांनी राज्यपालांच्या विधानाचा प्रखर शब्दांत शनिवारी समाचार घेतला व रविवारी सकाळी त्यांच्या घरी ‘ईडी’ची पथके पोहोचली. लोक काय ते समजून गेले. भाजप प्रत्येक गोष्ट पैसा, संपत्ती, व्यापारातच तोलतो. त्यामुळे त्यांना रक्त, घाम, अश्रूंचे मोल नाही. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजप विचारांच्या लोकांचा सहभाग नव्हता. त्याचप्रमाणे मुंबईसह महाराष्ट्राच्या लढ्यातही भाजप परिवार कोठेच नसल्याने त्यांना मराठी अस्मिता कशाशी खातात ते माहीत नाही. मुंबईतील धनिक मंडळ हेच त्यांचे सर्वस्व आहे. बेळगावसह मराठी सीमा भागाविषयी त्यांना आस्था नाही. महाराष्ट्राचे दोन-तीन तुकडे पडले तरी भाजपचे मन अस्वस्थ होणार नाही. हा त्यांचा स्वभावधर्म, गुणधर्म आहे,’ असा हल्लाबोल शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
‘राज्यपालांकडून मतपेढी करण्याचं काम’
‘घटनात्मक पदावर बसून मुंबई -महाराष्ट्राच्या नागरिकांत जात-प्रांताची भेदाभेदी करणारी विधाने राज्यपाल कोश्यारी करीत आहेत. मुंबई-ठाणे काय किंवा महाराष्ट्र काय, मराठी माणसांबरोबर इतर भाषिक व प्रांतिक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. कोठेही मिठाचा खडा पडलेला नाही. कोविड काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री या नात्याने सगळ्यांचाच सांभाळ केला. राज्यपाल मात्र जात-प्रांतात भेदाभेदी करून महाराष्ट्रात व हिंदुत्वात फूट पाडत आहेत. त्यामुळे कोश्यारी यांना राज्यपाल म्हणायचे की आणखी काही, असा प्रश्न मराठी माणसाला पडला असेल तर तो चुकीचा कसा म्हणता येईल! गुजराती, राजस्थानी, हिंदी भाषिक लोक यांना वेगळे पाडून भाजपसाठी वेगळी ‘मतपेढी’ करण्याचे काम घटनात्मक पदावरील व्यक्ती करत असेल तर राष्ट्रीय एकात्मतेची ऐशी की तैशी व्हायला वेळ लागणार नाही,’ अशा शब्दांत शिवसेनेनं राज्यपालांवर निशाणा साधला आहे.