रायगड :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार आणि खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष चांगलाच धुमसत आहे. शिवसैनिक आणि बंडखोर गटाचे समर्थक आमने-सामने येत असताना काही ठिकाणी हिंसक घटनाही घडत आहेत. माथेरानचे शिवसेना नेते प्रसाद सावंत यांना अज्ञाताने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सावंत यांना रविवारी फोनवरून ही धमकी देण्यात आली. याच प्रसाद सावंत यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्लाही करण्यात आला होता.

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर माथेरानचे शिवसेना नेते प्रसाद सावंत हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने राहिले होते. तसंच कर्जतचे बंडखोर शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचा फोटोही त्यांनी माथेरानच्या शिवसेना शाखेतून काढला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रसाद सावंत हे कर्जतला गेलेले असताना अज्ञातांनी रस्त्यात अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. यातून ते थोडक्यात वाचले. या हल्ल्याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल करण्यात आला असून हल्ल्यातील जवळपास ८ ते १० आरोपी हे अजूनही फरार आहेत.

राऊतांच्या घरी सापडलेल्या दहा लाखांच्या कॅशवर ‘एकनाथ शिंदें’चं नाव, बंधू सुनील राऊतांचा आरोप

दरम्यान, जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेले प्रसाद सावंत हे सध्या माथेरानमधील घरी विश्रांती घेत आहेत. रविवारी ३१ जुलै रोजी त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्या इसमाने सावंत यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली. तुझी नेतेगिरी माथेरानमध्येच कर, कर्जतमध्ये आला तर मागच्या वेळी फक्त मारहाण करून सोडलं, पण यावेळी जीवे मारू, अशी थेट धमकी फोन करणाऱ्या इसमाने दिली.

याप्रकरणी प्रसाद सावंत यांनी माथेरान पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची मागणी सावंत यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here