सिंधुदुर्ग : शिवसेनेतील फुटीनंतर युवासेनेचे प्रमुख आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या राज्यभर शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. तसंच आदित्य यांच्याकडून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधला जात आहे. आदित्य ठाकरे यांची ही शिवसंवाद यात्रा आज सावंतवाडीतील शिवसेनचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात पोहोचणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले आदित्य ठाकरे आज सकाळी ११ वाजता प्रथम चिपी विमानतळ येथून कुडाळमध्ये दाखल होतील. यावेळी शिवसैनिकांकडून आदित्य ठाकरे यांचे भव्य रॅली काढून स्वागत करण्यात येईल. त्यानंतर आदित्य यांची सावंतवाडी येथे जाहीर सभा होईल. बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या होम पिचवर आदित्य ठाकरे काय बोलणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. कारण नुकतंच दीपक केसरकर यांनी मतदारसंघातील आपल्या गटाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शक्तिप्रदर्शन केले होते. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सावंतवाडीत पोहोचत आहे. ही यात्रा दीपक केसरकर यांच्या निवासस्थानाच्या जवळूनच जाणार असल्याने केसरकर यांच्या निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्याधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी १२ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेशही जारी केला आहे.