मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचलनालयानं अटक केली आहे. ईडीनं काल सकाळी ७ वाजता राऊतांच्या घरावर धाड टाकली. संध्याकाळपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. घराची झाडाझडती घेण्यात आली. ईडीच्या अधिकाऱ्यांना राऊतांच्या घरात ११ लाख ५० हजार रुपयांची रोकड सापडली. त्यानंतर राऊत यांना ताब्यात घेण्यात आलं. रात्री उशिरा त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली.

गेल्या अनेक महिन्यांपासून संजय राऊत भाजपला एकटे अंगावर घेत आहेत. त्यामुळे भाजपनं सातत्यानं त्यांना लक्ष्य केलं. २०१९ च्या अखेरपासून याची सुरुवात झाली. विधानसभेची निवडणूक झाली. निकाल लागला. भाजपला १०५, तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली असल्यानं त्यांचं सरकार येणं अपेक्षित होतं. मात्र मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षातले संबंध टोकाला गेले आणि शिवसेनेनं थेट काँग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा केला.
एका राऊतांना ‘ईडी’कडून अटक, दुसऱ्या राऊतांनी मोर्चा सांभाळला; सकाळच्या पत्रकार परिषदा सुरुच
शिवसेनेचा मुख्यमंत्रा करण्यास राऊतांची भूमिका महत्त्वाची होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या मदतीनं राऊत जबरदस्त राजकीय चाल खेळले. राज्यात महाविकास आघाडीचा जन्म झाला. सत्ता संघर्षाच्या काळात राऊतांनी भाजपवर टीकेचे बाण सोडले. दररोज सकाळी ते माध्यमांशी संवाद साधायचे. भाजपवर घणाघाती टीका करायचे. पवारांच्या राजकीय कौशल्याच्या मदतीनं त्यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळवून दिलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

राज्यात ठाकरे सरकार आल्यानंतरही राऊत यांचा धडाका सुरूच होता. करोना काळात होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण, एनसीबीचे छापे, ईडीकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होत असलेल्या कारवाया यासह अनेक बाबींवर राऊत भाष्य करायचे. भाजप नेत्यांकडून होत असलेले शाब्दिक हल्ले परतवून लावण्याचं काम त्यांनी केलं. मविआ सरकारसाठी ढाल बनून काम केलं.
संजय राऊत अत्यंत बुद्धिमान, एकनाथ शिंदेंच्या नावाने घरात १० लाख मुद्दाम ठेवले असतील: केसरकर
ठाकरे सरकारवर होत असलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचं काम राऊतांनी केलं. पक्षात त्यांचं महत्त्व वाढत गेलं. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं. त्यात राऊतांचा मोठा वाटा होता. त्यामुळेच राऊत भाजपच्या रडारवर आले. त्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला. शिवसेनेच्या अनेक नेत्यांवरही ईडीची कारवाई सुरू झाली. एकनाथ शिंदेंनी बंड केलं. सेनेच्या ४० आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. ठाकरे सरकार कोसळलं. त्यानंतर राऊत यांच्यावरील ईडीची कारवाई वेग धरणार असं म्हटलं जात होतं. शिंदे सरकारला महिना पूर्ण होताच ईडीनं राऊतांना अटक केली. मात्र राऊत यांचा झुकेगा नहीं पवित्रा कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here