मुंबईतील नागरिकांना गावी जायला कोणीही विरोध केला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई, पुणे, ठाणे या जिल्ह्यांचे जिल्ह्याधिकारी, पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवून फक्त गावी येणाऱ्या लोकांना परवानगी देताना मर्यादित प्रमाणात द्यावी, असे म्हटले आहे. पण त्यावर उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. ती वस्तुस्थितीला धरून नाही. सिंधुदुर्गच्या किंवा रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्गात येणाऱ्यांना परवानगी देऊ नये असे कुठेही म्हटलेले नाही, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. क्वारंटाइन केलेले लोक जर बाहेर फिरत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. गावी येण्यासाठी परवाने मर्यादित स्वरूपात देण्यात येणार असल्याने आता गावी येणार्यांची गर्दी ओसरेल आणि यंत्रणेवर ताण पडणार नाही. जिल्ह्यात आजवर सुमारे २० हजार नागरिक आले असल्याची माहिती सामंत यांनी दिली. आमदार नितेश राणे यांनी स्वखर्चातून आर्सेनिक गोळ्यांचे वाटप केल्याबद्दल सामंत यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सध्या गावोगावी मुंबईहून आलेल्यांची संख्या भरमसाठ वाढली आहे. खारेपाटण पुलावर तर खूपच गर्दी होत आहे. त्यावर नियंत्रण करणे अवघड झाले आहे. गावोगावी ज्या शाळा इमारती आहेत तिथे पुरेशा सुविधा नाहीत, अशा परिस्थितीत गावपातळीवरच्या समितीवर मोठा ताण आला आहे.
दरम्यान, सिंधुदुर्गातील बाधित रुग्ण संख्या कमी होत आहे. आठ पैकी आता चारच रूग्ण उपचार घेत आहेत. इतर चार जण पूर्ण बरे झाले आहेत. त्यामुळे जिल्हावासीयांना हा एक दिलासा मिळाला आहे.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines