सिंधुदुर्ग : युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज कोकणात पोहोचली आहे. कुडाळमधील सभेत बोलताना आदित्य यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह भाजपविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘राज्यात सध्या दोन लोकांचं जम्बो मंत्रिमंडळ आहे. यामध्ये मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण हेच कळत नाही. काही जण तर उपमुख्यमंत्र्यांनाच पंतप्रधान म्हणतात,’ असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर आक्रमक झालेल्या आदित्य ठाकरे यांनी आजही आपल्या भाषणात बंडखोरांचा जोरदार समाचार घेतला. ‘भाजपला शिवसेना संपवून महाराष्ट्राचे पाच तुकडे करायचे आहेत आणि आपले ४० निर्लज्ज आणि गद्दार लोक त्यांच्यात सामील झाले आहेत. त्यांना ठाकरे कुटुंबालाही संपवायचं आहे. मात्र तुम्ही ठाकरे कुटुंबाला संपवू शकत नाही,’ अशा शब्दांत आदित्य यांनी भाजप नेतृत्वावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. राजभवनावर धडकण्यापूर्वीच पोलिसांनी आव्हाडांना ताब्यात घेतलं, अर्ध्या तासात आंदोलन गुंडाळलं
‘सतत दिल्लीसमोर जाऊन झुकत आहेत’
मंत्रिमंडळ विस्तारात झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. ‘आपल्या गटात घेण्यासाठी ते लोकांना मंत्रिपदं आणि महामंडळाची आश्वासने देत आहेत. त्यांनी एवढ्या लोकांना आश्वासनं देऊन ठेवली आहेत की जसं काय तीन-चार राज्यांमध्ये यांचं मंत्रिमंडळ होणार आहे. सरकार स्थापन होऊन एक महिना झाला तरी त्यांना अजून तिसरा माणूस निवडता आलेला नाही. सतत दिल्लीसमोर जाऊन झुकावं लागत आहे. आधी कसं ठाण्यातून मुंबईत यायचे आणि आम्ही तर एवढा विश्वास ठेवलेला की यांना विचारावं पण लागत नव्हतं,’ असं ते म्हणाले.
दरम्यान, विश्वासघाताने आलेलं हे सरकार फार काळ टिकणार नाही, या दाव्याचाही आदित्य ठाकरेंनी पुनरुच्चार केला आहे.