सातारा : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने रविवारी रात्री उशिरा अटक केली. राऊत यांच्यावरील या कारवाईनंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत राज्यभरात निदर्शने केली आहेत. तसंच ईडीने अटक करण्यापूर्वी स्वत: राऊत यांनी कसलीही कारवाई झाली तरी मी मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार असल्याचं म्हटलं. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘ईडीने केलेल्या कारवाईनंतर संजय राऊत कांगावा करत आहेत. पुरावे जमा करूनच ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. ईडी ही स्वायत्त संस्था असून त्यांच्या कामकाजात कोणीही हस्तक्षेप करत नाही. कारवाई कशी चुकीची आहे, हे संजय राऊत यांनी पटवून द्यावं. कर नाही त्याला डर कशाला? या कारवाईत भाजपचा कसलाही हात नाही,’ अशी भूमिका शंभूराज देसाई यांनी मांडली आहे.

पवारांसाठी संजय राऊतांची उपयुक्तता आता संपलीय, म्हणून ते काहीच बोलले नाहीत: शिरसाट

दरम्यान, संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यासाठी ईडीने हे खोटं प्रकरण उभं केलं आहे, असा आरोप संजय राऊत यांचे बंधू आणि शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनी केला होता. यावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, ‘कारवाई झाल्यावर सगळेच आम्हाला अडकवलं गेलं आहे, असं म्हणतात. मात्र हे म्हणणं चुकीचं आहे. संजय राऊतांच्या बोलण्यानं आणि वागण्यानं गेल्या दोन वर्षात जे तयार केलं आहे त्याचा हा परिणाम असून त्यांनीच शिवसेना संपवली आहे,’ अशी घणाघाती टीकाही शंभूराज देसाईंनी केली आहे.

नेमकी का झाली कारवाई?

शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रविवारी अटक केली. त्याआधी त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यामध्ये ११.५० लाख रुपयांची रोख जप्त करण्यात आली. पत्राचाळ पुनर्विकासप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. गोरेगावच्या पत्राचाळ पुनर्विकासाच्या संबंधीचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात ‘ईडी’ने २ फेब्रुवारीला अटक केलेले प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्या जवळचे असल्याचे ‘ईडी’च्या तपासात समोर आले आहे.

प्रवीण राऊत हे गुरू आशीष कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे संचालक आहेत. या कंपनीने म्हाडाच्या जमिनीवर वसलेल्या पत्राचाळीचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडासोबत करार केला होता. ही चाळ तब्बल ४७ एकरावर वसली असून, तेथे ६२७ भाडेकरू आहेत. या सर्वांसाठी घरे बांधून ती म्हाडाला दिली जावी, असा करार २०१०मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर प्रवीण राऊत यांनी हौसिंग डेव्हलपमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरचे (एचडीआयएल, डीएचएफएफ समुहातील कंपनी) राकेश वाधवान, सारंग वाधवान व अन्य संचालकांना हाताशी घेत या चाळ पुनर्विकासापोटी मिळणाऱ्या चटई क्षेत्र निर्देशांकाची (एफएसआय) परस्पर अन्य बांधकाम विकासकांना विक्री केली. याद्वारे त्यांनी तब्बल १,०७४ कोटी रुपये बेकायेदशीर जमवले. पण, त्याचवेळी पत्राचाळीचा मात्र एक इंचदेखील पुनर्विकास केला नाही. त्याखेरीज याआधारे त्यांनी बँकेतूनही ९५ कोटी रुपयांचे कर्ज मिळवले, असे ‘ईडी’च्या तपासात समोर आले आहे.

हा सर्व पैसा प्रवीण राऊत यांनी त्यांचे मित्र, कुटुंबीय यांच्या विविध खात्यांत वळते केले. यातील ८३ लाख रुपये प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा केले. त्याच रक्कमेतून वर्षा संजय राऊत यांनी दादर येथे फ्लॅट घेतला, असा ‘ईडी’चा संशय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here