Uddhav Thackeray press conference | इतर पक्षातील नेते भाजपमध्ये येत असतील तर भाजपचा वंश तरी नेमका कुठून सुरू होतो, हे नड्डा यांनी सांगावे. आजचं राजकारण हे निर्घृण आणि घृणास्पद आहे. भाजप त्यांच्यासोबत येणाऱ्यांना गुलाम बनवते. या गुलामांची गरज संपली की नंतर त्यांना बाजूला करून नवे गुलाम भरती करते, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

 

Uddhav Thackerya warns
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • मला संजय राऊत यांच्याविषयी अभिमान आहे
  • संजय माझा जुना मित्र आहे
  • आज मी त्याच्या घरी जाऊन त्याच्या आई, बहिणी आणि मुलींची भेट घेतली
मुंबई: राजकारणाची तुलना सहसा बुद्धिबळाशी केली जाते. पण आजच्या राजकारणात फक्त बळाचा वापर केला जात आहे. आज तुमच्याकडे बळ आले म्हणून तुम्ही सगळ्यांना संपवत आहात. पण दिवस हे नेहमी सारखे नसतात. जेव्हा हे दिवस फिरतील, तेव्हा तुमचे काय होईल याचा विचार भाजपने करावा, असा गर्भित इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. ते सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (Shivsena chief Uddhav Thackeray press conference in Mumbai)

यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बिहारमध्ये केलेल्या भाषणाचा समाचार घेतला. जे.पी. नड्डा यांनी आगामी काळात देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील आणि फक्त भाजपच उरेल, असे वक्तव्य केले होते. इतर पक्षात २०-३० वर्षे राहिलेले नेते भाजपमध्ये येत आहेत, असे जे.पी. नड्डा म्हणाले. तसेच आमचा घराणेशाहीला विरोध आहे, असे नड्डा यांनी म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, इतर पक्षातील नेते भाजपमध्ये येत असतील तर भाजपचा वंश तरी नेमका कुठून सुरू होतो, हे नड्डा यांनी सांगावे. आजचं राजकारण हे निर्घृण आणि घृणास्पद आहे. भाजप त्यांच्यासोबत येणाऱ्यांना गुलाम बनवते. या गुलामांची गरज संपली की नंतर त्यांना बाजूला करून नवे गुलाम भरती करते, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
ठाकरे सरकारचे निर्णय रद्द करणे घटनाबाह्य; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान
यावेळी उद्धव ठाकरे यांनी ईडीच्या अटकेत असलेल्या संजय राऊत यांच्याबाबतही भाष्य केले. मला संजय राऊत यांच्याविषयी अभिमान आहे. संजय माझा जुना मित्र आहे. आज मी त्याच्या घरी जाऊन त्याच्या आई, बहिणी आणि मुलींची भेट घेतली. संजयचा गुन्हा काय होता? संजय पत्रकार आहे, शिवसैनिक आहे. निर्भीड आहे आणि जे पटत नाही ते बोलतो. संजयने काल म्हटलेली एक गोष्ट महत्त्वाची आहे. मरण आलं तरी शरण जाणार नाही, हे संजयने म्हटलं. हे फार महत्त्वाचं आहे. तोदेखील शरण जाऊ शकला असता. जे आत्ता शरण गेले आहेत, ते सध्या हमामध्ये आहेत. सध्या त्यांच्याभोवती सत्तेचा फेस आहे. त्यामुळे ते आमच्यावर टीका करत आहेत. एकदा का हा फेस बाजूला झाला की त्यांना आणि लोकांना नेमकी परिस्थिती काय, याची जाणीव होईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

पवारांसाठी संजय राऊतांची उपयुक्तता आता संपलीय, म्हणून ते काहीच बोलले नाहीत: शिरसाट
जे.पी. नड्डा नेमकं काय म्हणाले?

आगामी काळात देशातील सर्व पक्ष संपतील, फक्त भाजप हाच एकमेव पक्ष शिल्लक राहील. भाजप हा विशिष्ट विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. आपल्या विचारांसमोर सर्व पक्ष नष्ट होतील. जे उरतील तेदेखील संपून जातील, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P.Nadda) यांनी केले होते. आजघडीला भाजपशी लढणारा कोणताही राष्ट्रीय पक्ष शिल्लक राहिलेला नाही. आपली खरी लढाई ही घराणेशाहीविरोधात आहे. भाजप हा एका विचारधारेवर लढणारा पक्ष आहे. हा विचार नसता तर आपण इतकी मोठी लढाई लढू शकलो नसतो, हे मी सगळ्यांना वारंवार सांगत असतो. भाजपसमोर सर्वजण नष्ट झाले आहेत. जे झाले नाहीत तेदेखील संपतील. केवळ भाजप हा एकमेव पक्ष उरेल, असेही त्यांनी सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here