युट्युबवर पाहून तयार केली वाईन…
ही धक्कादायक घटना तिरुवनंतपुरममधील आहे. जिथे एका १२ वर्षाच्या मुलाने यूट्यूबवर व्हिडिओ पाहून द्राक्षाची वाईन बनवली आणि त्याच्या वर्गातील मित्रांना पाजली. यामुळे मुलांची प्रकृती खालावली असल्याचं समोर आलं. सर्व मित्रांना रुग्णालयात दाखल करावे लागले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाईन प्यायल्यानंतर मुलांना उलट्या होऊ लागल्या, त्यानंतर त्यांना चिरायंकीझू येथील जवळच्या रुग्णालयात दाखल करावे लागले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल अशीही माहिती आहे.
पालकांनी द्राक्षे विकत आणली होती…
ही घटना शुक्रवारी, २९ जुलै रोजी एका सरकारी शाळेत घडली. पोलिसांना माहिती मिळताच या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास केला असता मुलाने धक्कादायक माहिती समोर आणली. मुलाने सांगितले की, त्याने आई-वडिलांनी विकत घेतलेल्या द्राक्षांचा वापर करून वाईन बनवली होती. त्यात त्याने इतर कोणतेही अल्कोहोल किंवा स्पिरिट टाकले नाही. युट्युबवर दिसलेल्या व्हिडीओनुसार दारू बनवल्यानंतर त्याने ती बाटलीत भरली आणि जमिनीखाली पुरली.
तपासणीसाठी पाठवले वाईनचे नमुने…
पालकांना यासंबंधी विचारलं असता तो दारू बनवतो हे त्यांना माहीत होतं. पण त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही. अशात स्थानिक न्यायालयाच्या परवानगीनंतर पोलिसांनी वाईनचे नमुने गोळा करून रासायनिक तपासणीसाठी पाठवले. तपासात अन्य दारू किंवा स्पिरीट आढळून आल्यास पोलिसांवर बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा लागेल. पोलिसांनी मुलाच्या पालकांना आणि शाळेच्या अधिकाऱ्यांनाही त्याच्या कृत्याचे कायदेशीर परिणाम कळवले आहेत.