भारताने दिलेल्या आव्हानाला पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी पॉवर प्लेमध्ये तुफान फटकेबाजी करत पहिल्या ६ षटकांमध्ये ४६ धावा ठोकल्या. त्यानंतर भारताने विंडीजच्या संघाला पहिला धक्का दिला. पॉवर प्लेनंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पकड निर्माण करत वेस्ट इंडिजच्या धावसंख्येला ब्रेक लावला. अखेरच्या षटकात वेस्ट इंडिजला विजयासाठी १० धावांची आवश्यकता होती. मात्र भारताच्या आवेश खानकडून पहिल्याच चेंडूवर चूक झाली आणि हा चेंडू नो बॉल ठरला. त्यानंतर मिळालेल्या फ्री हिटचा फायदा घेत विंडीजच्या डेवोन थॉमसने षटकार खेचला आणि दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारत विंडीजच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ब्रँडन किंगने केलेली ६८ धावांची वादळी खेळी आणि डेवोन थॉमसने शेवटी फटकावलेल्या ३१ धावा वेस्ट विंडीजसाठी गेमचेंजर ठरल्या.
दरम्यान, भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरू होणार होता. मात्र वेस्ट इंडिजच्या संघाला साहित्य मिळण्यास विलंब झाल्याने सामन्याला उशीर झाला आणि अखेर रात्री ११ वाजता दोन्ही संघ मैदानावर उतरले.