कंटेनमेंट झोनमधून सिंधुदुर्गात येणाऱ्यांनाच आता संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात येणार असून ज्या व्यक्ती कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रातून येणार आहेत त्यांना गृह अलगीकरणात ठेवण्यात यावे, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ग्राम समिती आणि वॉर्ड समितीवर याचे नियोजन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेली व्यक्ती कंटेनमेंट झोनमधून आलेली असल्यास व त्याचे स्वत:चे स्वतंत्र घर असल्यास, विलग राहण्याची सोय असल्यास त्याची खात्री करून गृह अलकीरण करण्यात यावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. या सुविधा नसल्यास ग्राम व वॉर्ड समितीने निश्चित केलेल्या ठिकाणी संबंधित व्यक्तीने संस्थात्मक अलगीकरणात राहावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अलगीकरणातील व्यक्ती गावात वा शहरात कोठेही फिरणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. अशी व्यक्ती फिरताना आढळल्यास जवळच्या पोलीस ठाण्यास त्याबाबत कळवावे व त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथ रोग नियंत्रण कायदा १८९७ नुसार पोलिसांनी कारवाई करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
असे असतील नियम…
> अलगीकरणात असलेल्या व्यक्तीमध्ये सदृष्य आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला तातडीने जवळच्या कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल करावे व वैद्यकीय अधिकारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या समन्वयाने स्वॅब तपासणीची कार्यवाही करावी.
> जिल्ह्यात बाहेरून आलेल्या प्रवाशांमध्ये सर्दी, ताप , खोकला, श्वसनाचा त्रास अशी लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तींचा स्वॅब, जिल्हा शल्य चिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात यावा.
> ज्या व्यक्तीच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह येईल, अशा व्यक्तीच्या आजारपणाची लक्षणे, तीव्रता लक्षात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांनी संबंधित रुग्णास कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ केअर सेंटर किंवा येथे ठेवण्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही करावी.
> संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था ज्या ठिकाणी करण्यात आली आहे तिथे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे.
> तपासणी नाक्यावर तैनात अधिकारी व कर्मचारी यांनी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांचा परवाना तपासून सदर परवाना संबंधित कार्यालयाकडूनच दिला असल्याची खात्री करावी. येणाऱ्यांची आरोग्य तपासणी करावी.
> गावात येणाऱ्या बाहेरील प्रवाशांकडून विलगीकरणासंबंधीच्या सूचनांचे पालन करण्याबाबत हमीपत्र घ्यावे. प्रवाशांची माहिती संकलीत करून गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांना त्वरीत कळवावे. सदरची माहिती प्राप्त होताच संबंधित यंत्रणांनी ही माहिती ग्राम, वॉर्ड नियंत्रण समितीकडे तात्काळ पाठवावी.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines