राऊत यांच्या अटकेनंतर भाजपला इशारा देत असताना शिवसेनेनं सरकारविरुद्ध लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ‘सत्तेचा अमरपट्टा बांधून कोणीच जन्मास आलेले नाही. शिवरायांचे हे राज्य बुडावे, त्याआधी ते नामर्द करावे असे कुणास वाटत असेल तर ते भांगेच्या नशेत आहेत, भांगेच्या नशेतील स्वप्न ते पाहत आहेत. महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील,’ असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
शिंदे गटावर घणाघाती टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत भाजपसोबत युती केली आहे. या बंडखोरांवर शिवसेनेनं आक्रमक शब्दांत टीकास्त्र सोडलं आहे. ‘शिवसेनेतून शिंदे नामक गटात जे आमदार, खासदार सामील झाले व जे स्वतःची पोकळ छाती लपवून हिमतीचे बोल बोलत आहेत त्यातील अनेकांवर ‘ईडी’, आयकर खाते यांच्या कारवायांचा फक्त बडगाच उगारला गेला नव्हता तर त्यांच्या अटकेपर्यंत प्रकरण पोहोचले होते. आता हे सर्व लोक पुण्यात्मे झाले व ‘कर नाही त्याला डर कशाला’ अशा चिपळ्या वाजवत आहेत. मात्र या पळपुट्या नामर्द लोकांमुळे शिवरायांचा महाराष्ट्र बदनाम होत आहे,’ असा हल्लाबोल शिवसेनेनं केला आहे.
दरम्यान, कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांना सोमवारी कोर्टाकडून ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ‘पत्राचाळ पुनर्विकास व एफएसआय घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे फ्रंट मॅन म्हणून कार्यरत होते. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्यानेच प्रवीण यांनी म्हाडाकडून आवश्यक त्या मंजुरी मिळवल्या. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात प्रवीण यांनी अवैधरीत्या मिळवलेल्या ११२ कोटी रुपयांपैकी १ कोटी ६ लाख रुपये हे संजय राऊत व त्यांच्या कुटुंबीयांकडे थेट गेले असल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले असून ही रक्कम आणखीही असू शकते’, असा दावा करत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) संजय राऊत यांची आठ दिवसांची ईडी कोठडी सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयाकडे मागितली. तर ‘माझ्याविरोधातील ही कारवाई निव्वळ राजकीय सूडबुद्धीने आहे’, असा दावा राऊत यांनी केला. अखेरीस न्या. एम. जी. देशपांडे यांनी ईडीची आठ दिवसांची विनंती अमान्य करत राऊत यांना गुरुवार, ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली.