आफराचा भाऊ मोहम्मदला स्पायनल मस्क्युलर एट्रोफी नावाचा दुर्मीळ आजार झाला. तो २ वर्षांच्या वयाचा होण्यापूर्वी त्याला १८ कोटी रुपयांचं इंजेक्शन देण्याची गरज होती. भावाचा जीव वाचवण्यासाठी आफरानं लोकांना आवाहन केलं. स्वत: व्हिलचेअरवर असलेली आफरा मोहम्मदसाठी परिस्थितीशी मोठ्या निर्धारानं दोन हात करत होती. भावासाठी लढणाऱ्या आफराचा व्हिडीओ जगभरात व्हायरल झाला. त्यानंतर लोकांनी सढळ हातांनी मदत केली.
आजारामुळे माझे पाय आणि पाठीचं हाड वळलं आहे. मला झोपणंही कठीण जात आहे. मात्र माझ्या लहान भावाची स्थिती अशी नाही. तो जमिनीवर रांगत आहे आणि सक्रिय आहे. त्याला आताच औषध मिळाल्यास तो वाचू शकेल. तुम्ही सगळ्यांना मदत केल्यास त्याला वाचवता येईल. त्याची अवस्था माझीसारखी होऊ नये, असं आवाहन आफरानं काल केलं.
आफराच्या आवाहनाला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. लोकांनी १८ कोटींच्या जागी ४६ कोटी रुपये गोळा केले. स्पायनल मस्क्युलर एट्रोफी आजारानं ग्रस्त असलेल्या आफराला गायन आणि चित्रकलेची आवड होती. अतिशय हुशार असलेल्या आफराला डॉक्टर व्हायचं होतं. सफा इंग्लिश माध्यमाच्या शाळेत ती दहावीत शिकत होती. मट्टूल सेंट्रल जुमा मशीद कब्रस्तानात आफरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.