औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील क्रांती चौक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतादरम्यान रात्री १० वाजल्यानंतरही लाऊडस्पीकर सुरू ठेवल्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह आयोजकांविरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आनंद ज्ञानदेव कस्तुरे असं तक्रारदाराचं नाव असून थेट मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ३० आणि ३१ जुलै रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ३१ जुलै रोजी सिल्लोड येथील सभा आटोपून त्यांनी शहरात विविध महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तसंच आपल्या गटात सामील झालेल्या आमदारांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यक्रम केले. त्यानंतर रात्री क्रांती चौक येथे त्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहरातील शिंदे गटातील सर्वच आमदार तसंच कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांना ‘मोदी स्टाईल’ अंगाशी; स्वत:च्याच नावाच्या उद्यानाचे करणार होते उद्घाटन, टीकेनंतर कार्यक्रम रद्द

शहरात भरगच्च कार्यक्रम असल्याने क्रांती चौकात मुख्यमंत्री रात्री उशिरा पोहोचले. साधारण १० ते १०.३० वाजताच्या दरम्यान मुख्यमंत्री क्रांती चौकात येथे आले. तेथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. बराच वेळ स्वागत सोहळा सुरू होता. यावेळी लाऊडस्पीकरही लावण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला आहे, अशी तक्रार आनंद कस्तुरे यांनी केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here