सेंट किट्स : दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताला वेस्ट इंडिजचा संघाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या सामन्यात विंडीजच्या संघाने ५ विकेट्स राखून भारतावर विजय मिळवला. सामन्याआधी मजबूत दिसणाऱ्या भारतीय संघावर मात करण्यात विंडीजसाठी खरा मॅचविनर ठरला तो ओबेड मॅकॉय हा गोलंदाज. मॅकॉयने भारताच्या तब्बल ६ फलंदाजांना बाद करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.

वेस्ट इंडिजच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय ओबेड मॅकॉयने योग्य ठरवला. सामन्याच्या पहिल्या चेंडूपासूनच त्याने भारताला धक्के देण्यास सुरुवात करत कर्णधार रोहित शर्माला बाद केलं. त्यानंतर ठराविक अंतराने खेळाडू बाद होत राहिल्याने अखेर भारताला २० षटकांमध्ये केवळ १३८ धावाच करता आल्या. त्यानंतर विंडीजच्या फलंदाजांनीही चमक दाखवत भारताने दिलेलं आव्हान गाठलं आणि दुसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. दिग्गज फलंदाजांचा भरणा असणाऱ्या भारताच्या ६ फलंदाजांना तंबूत धाडणारा ओबेड मॅकॉय याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं.

मोठा बदल… तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्याचीही वेळ बदलली, पाहा किती वाजता सुरु होणार लढत…

पुरस्कार आईला समर्पित…

धारदार गोलंदाजीने भारतीय फलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या ओबेड मॅकॉय याने आपला सामनावीराचा पुरस्कार आईला समर्पित केला आहे. ओबेड याची आई मागील काही महिन्यांपासून आजारी आहे. सामना संपल्यानंतर झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ओबेडनं म्हटलं की, ‘हा पुरस्कार मी माझ्या आईला समर्पित करतो. ती आजारी आहे, मात्र मी सर्वोत्तम खेळाडू बनावं यासाठी तिने नेहमीच प्रेरित केलं आहे.’

दरम्यान, ओबेड मॅकॉयच्या या कृतीनंतर इतर खेळाडूंसह मैदानात उपस्थित असलेले क्रिकेटरसिकही काही काळासाठी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here