२०१७-१८ मध्ये विकासक एचडीआयएलनं दिवाळखोरी जाहीर केली. तेव्हा इथल्या प्रत्येक घरमालकाला महिन्याला ४० हजार इतकं भाडं मिळत होतं. पत्रा चाळीच्या पुनर्विकासाला २००८ मध्ये सुरुवात झाली. त्यावेळी घरमालकांना महिन्याला १८ हजार रुपये भाडं मिळत होतं. शेवटचा चेक आम्हाला ४० हजारांचा मिळाला होता, असं पत्रा चाळीतील रहिवासी रमाकांत थोरवे यांनी सांगितलं. आम्ही कधीही शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी संपर्क केला नसल्याचं रहिवाशांनी सांगितलं.
चाळीच्या पुनर्विकासाठी त्रिपक्षीय करार करण्यात आला होता. गुरुआशिष कन्स्ट्रक्शन, ६७२ घरमालक आणि म्हाडा यांच्यामध्ये करार झाला होता. पत्रा चाळीच्या ६७२ कुटुंबांसाठी गुरुआशिष ६७२ फ्लॅट्स उभारणार, ३ हजार फ्लॅट्स म्हाडाला देणार आणि उरलेल्या जागेचा विकास करून शिल्लक जागा विकणार, अशा आशयाचा करार झाला होता.
गुरुआशिष कन्स्ट्रक्शननं सुरुवातीला बांधकाम हाती घेतलं. त्याचवेळी त्यांनी जमीन आणि एफएसआय दुसऱ्या विकासकाला १ हजार ३४ कोटींना विकल्याचा आरोप आहे. यानंतर गुरुआशिष एचडीआयएलमध्ये विलीन झाली. काही कालावधीनंतर एचडीआयएलनं दिवाळखोरी जाहीर केली. या प्रकरणी शिवसेना नेते रविंद्र वायकर यांनी सर्वप्रथम तक्रार दाखल केली आणि चौकशीची मागणी केली.