Aaditya Thackeray Kolhapur Rally: कोल्हापुरातील बंडखोर आमदार-खासदारांच्या मतदारसंघात भर पावसात आदीत ठाकरेंची तोफ धडाडली. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने कोल्हापुरातील शिवसैनिकांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांनी शिरोळ येथे मेळावा घेत भर पावसात शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गद्दारी केलेल्या ४० आमदार आणि १२ खासदार यांच्यातच दोन गट असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. दरम्यान, या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे यांनी नरसोबाची वाडी देवस्थानाचं दर्शन घेतलं. आदित्य ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधताना म्हणाले, कोल्हापूरहून येताना अनेकांनी मला थांबवलं, आपण मोठ्या संख्येने माझ्यासोबत आहात, आपला आशिर्वाद प्रेम पाहून हे पाहून मन भरून आलंय असं म्हणत गद्दारांना माफी नाही असं ठणकावून सांगितलं.

आदित्य ठाकरेंची खंत

मला एवढच विचारायचं आहे जे काही घाणेरडं राजकारण सुरू आहे हे तुम्हाला पटणारं आहे का? ही गद्दारी तुम्हाला पटणारी आहे का? असे सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित शिवसैनिकांना केले. ज्या खासदारांना मी मित्र मानलं त्यांच्यासोबत फिरलो, मानसन्मान दिला, ज्याला मित्र समजलं त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. काय कमी केलं यांना… यांनी जेव्हा फंड मागितला तेव्हा दिला. यांच्यावर विश्वास ठेवला ती आमची चूक झाली का? हे अपेक्षित नव्हतं यांना मिठीत घेताना, डोळे बंद असताना पाठीत खंजीर खुपसला, अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
‘राजकारण इतकं खालच्या पातळीवर गेलंय की…’

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray Kolhapur Rally) पुढे म्हणाले, हे राजकारण इतकं खालच्या पातळीवर गेलंय की मी तरुणांना कसं सांगू की तुम्ही राजकारणात या…यांना काय कमी केलं? गरजेपेक्षा जास्त आणि लायकी पेक्षा जास्त दिलं हे आमचं चुकलं, असं आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, भाषण सुरू असताना गर्दीतून एका व्यक्तीने आदित्य ठाकरे यांना फुल देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी ते फुल स्वीकारलं. हेही वाचा – ‘गद्दारांचे सरकार कोसळणारच’; पावसात कार्यकर्त्यांच्या गर्दीतून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
१२ खासदार, ४० गद्दार झाले त्यांच्यातही दोन गट

आदित्य ठाकरे यांनी बोलताना मोठा दावा केला. १२ खासदार गद्दार झाले, जे ४० गद्दार झाले त्यांच्यात ही दोन गट आहेत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. ज्यांच्यावर दडपण होतं त्यांनी जा सुखी रहा, काही जण पळून गेले तिथे तरी सुखी रहा. तिकडचे बननू रहा. पण आमदारकी, खासदारकीचा राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा, जनता जो कौल देईल तो मान्य आहे. पण ज्यांना आपण चुकलो असं जराही वाटत असेल तर त्यांनी परत या मातोश्रीची दारं त्याच्यासाठी उघडी आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
बंडखोर आमदारांना फटकारलं

जिथे ते गेले तिथे पूर आला होता. यांनी मदत करण्याऐवजी मज्जा मस्ती करत होते. हे पाहून मला लाज वाटत होती, टिव्हीवर दोन चित्र पहात होतो. एका ठिकाणी पूर परिस्थितीत नागरिकांना खायला अन्न नव्हतं आणि हे मजा मारत होते. हे लोकं राज्याचं नेतृत्व करू शकतात का? अशांना तुम्ही लोकप्रतिनिधी मानता का? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित करत बंडखोर आमदारांना फटकारलं.
राज्य सरकारवर हल्ला

यावेळी त्यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला. हे दोन लोकांचे जम्बो कॅबीनेट आहे, ज्यांना महाराष्ट्रातले नागरिक दिसत नाहीत. कारण हे दिल्ली वारी करण्यात व्यस्त आहेत, अशी खरमरीत टीका आदित्य ठाकरे यांनी केली. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. सोमवारी त्यांनी कोल्हापूर, जयसिंगपूर, आजरा इथे जाहीर सभा घेत बंडखोर आमदार – खासदारांचा समाचार घेतला.