Sunil Tambe | Maharashtra Times | Updated: Aug 2, 2022, 7:02 PM
कुणी उगाच गप्पांचं चऱ्हाट लावलं, की आपल्याला ‘चिमणराव’ आठवतो. उगाचच भोळसटपणे भक्ती करणारा, थोड्या प्रतिभेच्या दर्शनानंही दिपून जाणारा साहित्यप्रेमी पुढ्यात आला, की ‘सखाराम गटणे’ असाच असावा, असं वाटू लागतं. पायजमा-झब्बा घालणारा, जाड भिंगाचा चष्मा घालणारा, हातातली पुस्तकं सावरणारा, काहीसा धांदरट आणि डोळ्यांत ‘छप्पन सशांची व्याकुळता’ एकत्र साठलेला मनुष्यविशेष मग डोळ्यांसमोर येतो. मद्यशाळेतून लटपटत्या पायांनी बाहेर पडणाऱ्या, रोज ठरावीक वेळी ज्याची तहान अनावर होते, अशा मद्यप्रेमीला पाहताच, त्याला आपण ‘तळीराम’ म्हणून संबोधतो. कुठल्याही शंकास्पद प्रकरणी गायब झालेली व्यक्ती आपल्याला ‘मारुती कांबळे’ वाटते. त्या त्या लेखकांनी ती ती व्यक्तिरेखा त्यांच्या नावासकट जिवंत केली आहे. ‘फास्टर फेणे’ म्हटलं, की एक किडकिडीत, उंचापुरा, चपळ, चष्मीस आणि स्मार्ट मुलगा डोळ्यांसमोर उभा राहतोच. ही सर्व त्या लेखकांच्या प्रतिभेची जादू आहेच; शिवाय या नावांनी आपल्या मनात निर्माण केलेल्या प्रतिमेचीही जादू आहे. आपल्या भावविश्वात ठाण मांडून बसलेली अशी काही ‘खास नावं’ असलेली पात्रं तुम्हाला आठवतात का? या विशेष मालिकेत आपण आपल्या कलाविश्वात डोकावू आणि शेक्सपीअरलाच विचारू, नावात काय आहे म्हणतोस? अरे बाबा, नावात बरंच काही आहे.

फास्टर फेणे

फास्टर फेणे : ‘टॉक’ असा आवाज कानावर पडला, की मराठी प्रेक्षकांना चटकन आठवेल, तो अभिनेता अमेय वाघचा ‘फास्टर फेणे’. अजय सरपोतदार दिग्दर्शित २०१७मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानंतर साहित्यिक भा. रा. भागवत यांच्या मानसपुत्राच्या पुस्तकांच्या मालिकेला बाजारात नव्याने मागणी आली. धावण्यात आणि सायकल चालवण्यात वेगवान असल्यामुळे त्याचे मित्र त्याला ‘फास्टर फेणे’ म्हणतात. ‘फुरसुंगीचा फास्टर फेणे’पासून ही पुस्तकांची मालिका सुरू झाली. एका शालेय मुलाने धाडसाने केलेल्या कामगिरीच्या या धमाल आणि रंजक गोष्टी त्याच्या नावाशी घट्ट जोडले गेल्या आहेत.
बोक्या सातबंडे

बोक्या! नाव उच्चारताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो चुणचुणीत, खोडकर, धडपड्या, चाणाक्ष अन् हुशार मुलगा. प्रसिद्ध अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या ‘बोक्या सातबंडे’ या पुस्तकमालिकेतून उभे केलेले हे पात्र. त्याचे नाव खरे तर ‘चिन्मयानंद’. स्वभावाने अतिशय करामती असलेल्या या मुलाच्या नेमक्या वृत्तीची ओळख ‘बोक्या’ या नावातून होतेच होते. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे अत्यंत कुतूहलाने पाहणारा. आजीशी मैत्रिणीसारखं नातं असलेला…पण तितकाच द्वाड असणाऱ्या या मुलाचे चित्र मनात उभे करण्याचे काम ‘बोक्या’ हे नावच करते.
गोट्या

गोट्या! अभ्यासातील हुशारीसह अनेक अडचणीच्या प्रसंगात विविध क्लृप्त्या लढवणारी ‘गोट्या’ ही व्यक्तिरेखा नारायण धोंडो अर्थात ना. धो. ताह्मनकर यांनी मराठी साहित्यात अजरामर केली. १९४० च्या दशकात सुरू झालेल्या भा. ल. तथा काका पालवणकर यांच्या ‘खेळगडी’ या नियतकालिकात ‘गोट्या’ ही मालिका नियमित स्वरूपात सुरू झाली. त्यानंतर हा ‘गोट्या’ महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आणि मुलामुलींचा हक्काचा सवंगडी झाला. आजची पिढीही ‘गोट्या’ आवर्जून वाचते, यावरूनच ही व्यक्तिरेखा कालातीत असल्याचे अधोरेखित होते.
तळीराम

तळीराम : ‘संगीत एकच प्याला’ नावाचे, राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले नाटक १९१९मध्ये रंगभूमीवर आले. मद्यपान आणि त्याचे दुष्परिणाम असा या नाटकाचा विषय होता. ही एका शोकान्तिका आहे. यामध्ये अट्टल मद्यपी असलेले तळिराम नावाचे पात्र होते. हे नाटक गाजले. पुढे विविध संस्थांनी, कलाकारांनी त्याच्या रंगावृत्त्याही काढल्या. अगदी आधुनिक काळातही ते सादर झाले. तळीराम हे नाव मात्र त्यापलीकडे जाऊन, जनमानसात रुजले. एखादा अट्टल मद्यपी ‘तळीराम’ असतो. मद्यसेवन करू लागला, की त्याचा ‘तळीराम’ होतो आणि मद्याची तलफ भागविणारा, ‘तळीराम’ गार करीत असतो. अगदी माध्यमांमधील बातम्यांमध्येही मद्यपींसाठी ‘तळीराम’ हे संबोधन वापरले जाऊ लागले. हे सामर्थ्य गडकरींच्या लेखणीचे आणि आजपर्यंत ‘तळीराम’ साकारणाऱ्या कलाकारांचेही!
सखाराम गटणे

सखाराम गटणे : प्रख्यात मराठी साहित्यिक आणि आलम मराठी दुनियेचे भूषण पु. ल. देशपांडे यांनी रेखाटलेले हे एक काल्पनिक पात्र आहे. मात्र, गेल्या तीन चार पिढ्यांना ते आपले वाटत आहे. चार साडेचार फूट उंची, काळा रंग, स्थूल आणि वेडे वाकडे दात असलेले सखाराम अप्पाजी गटणे याचा वाडा पुण्यातील पेठेतला. प्रचंड वाचन, उत्तम स्मरणशक्ती, गरीब स्वभाव, मॅट्रिक पर्यंत शिक्षण, अर्धी विजार, त्यात अर्धामुर्धा इन केलेला शर्ट, गांधी टोपी घातलेला सख्या पुस्तकाचा फडशा पाडतो. अत्यंत शुद्ध मराठी बोलण्याची त्याची सवय लोकप्रिय आहे.
धनंजय माने म्हटलं की आठवतात अशोक सराफ

धनंजय माने : ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटानं धनंजय माने हे नाव मराठी माणसाच्या मनात रुजवलं. तसं हे नाव अनेक जणांचं; पण आज धनंजय माने म्हटलं, की अशोक सराफ आणि दार ठोठावणारे लक्ष्मीकांत बेर्डे हे दोन कलावंत उभे राहतात. त्याबरोबर आठवतं इस्राईलवरून येणारं, ७० रुपये किंमत असलेलं डायबेटिसवरचं औषध! या विषयावरचे अनेक मीम्स विविध प्रसंगी तयार होतात आणि फॉर्वर्डही होतात. आता तर याच नावाचं नाटकही आलं आहे. एकंदर काय, एखादा प्रसंग अगदी नेहमीच्या नावालाही वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतो आणि लोकांना आकर्षित करतो.