उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्याच्या कात्रजमध्ये हल्ला झालाय. ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी हा हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पुण्यात मोठा तणाव निर्माण झाला आहे. सध्या मिळत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार उदय सामंत मंगेशकर हॉस्पिटलला पोहोचले आहेत.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर होते. त्यांची सभा पुण्यातील कात्रज भागात सुरु होती. सभा संपल्यानंतर ते सभास्थळाहून निघाले. त्याचवेळी उदय सामंत यांची गाडी आदित्य जिथून निघाले आहेत, त्याच चौकात आली. यावेळी उपस्थित शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी सामंत यांच्या गाडीवर दगडफेक, चप्पलफेक केली आणि गद्दार..गद्दार, अशा घोषणा दिल्या. यावेळी शिवसैनिकांचा जमाव उदय सामंत यांच्या गाडीवर चालून गेला. त्यामुळे मोठा गोंधळ आणि तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या मध्यस्थीने १५-२० मिनिटांत तणाव निवळला.
मला जिवानिशी मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता
जमावाने केलेल्या हल्ल्यात उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली आहे. तसेच गाडीत त्यांच्या शेजारी बसलेल्या एका कार्यकर्त्याला दगड लागल्याने तो जखमी झाल्याची माहिती स्वत: उदय सामंत यांनी दिली आहे. हल्ल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना उदय सामंत यांनी सनसनाटी आरोप केला. ते म्हणाले, “माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता. कारण माझ्यावर चालून आलेल्या लोकांच्या हातात बेसबॉल स्टीक होत्या. अनेकांच्या हातात दगड होते. मला जिवानिशी मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. संबंधित लोक शिवीगाळ करत होते. माझ्या आई वडिलांची पुण्याई आणि देवाची कृपी म्हणून मी आजच्या हल्ल्यातून वाचलो”
हत्यारं घेऊन जर काही जण हल्ला करणार असतील….
माझ्यावर हल्ला झाल्यानंर काही जण सांगतायेत हल्ला करणाऱ्यांचा आम्हाला अभिमान आहे. पण हत्यारं घेऊन जर काही जण हल्ला करणार असतील आणि त्यांचा हे अभिमान बाळगत असतील तर महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या थराला चाललंय, याचा विचार करण्याची गरज आहे. काही लोकांच्या लेखी मी गद्दार असेल, मी धोका दिला असेल. पण निषेधाचं हे माध्यम असू शकत नाही, असंही उदय सामंत म्हणाले.