उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘ उदय सामंत यांच्या गाडीवर झालेला हा हल्ला भ्याड भ्याड हल्ला आहे. ही काही मर्दनगी नाही. जर कोणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असेल तर पोलीस कारवाई करत आहेत. कोणी आततायीपणा करत असेल तर पोलीस कारवाई करतीलच.’
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गुन्हा झाल्यावर पोलिसांना कारवाई करा म्हणून सांगवे लागत नाही. जे कोणी चिथावणीखोर भाषण करत असेल तर पोलीस कारवाई करतीलच. कोणी असे वक्तव्य केले असेल तर पोलीस तपासून त्यांच्या विरोधात कारवाई करतील. कायदा आणि सुव्यवस्था पोलीस पाहतील. प्रक्षोभक भाषण कोणी करत असेल तर पोलीस कारवाई करतील. मला राज्यात शांतता हवी आहे.
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर होते. त्यांची सभा पुण्यातील कात्रज भागात सुरू होती. सभा संपल्यानंतर ते सभास्थळावरून निघाले. त्याच वेळी उदय सामंत यांची गाडी आदित्य जेथून निघाले त्या कात्रज चौकात आली. यावेळी उपस्थित जमाव आक्रमक झाला. त्यांनी सामंत यांच्या गाडीवर दगडफेक आणि चप्पलफेक केली आणि ‘गद्दार गद्दार’ अशा घोषणा दिल्या. यावेळी जमाव उदय सामंत त्यांच्या गाडीवर वर चालून गेला. त्यामुळे मोठा गोंधळ आणि तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या मध्यस्थीने १५ ते २० मिनिटात हा तणाव निवळला. मात्र यामध्ये उदय सामंत यांची गाडीची काच फुटली. याची तक्रार उदय सामंत यांनी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दिल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. मात्र आज आदित्य ठाकरे हेही पुणे दौऱ्यावर होते. कात्रज येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार तानाजी सावंत यांच्या घरी जाणार होते. मात्र त्याच वेळेस आदित्य ठाकरे यांचीही कात्रज येथे सभा होती. पुण्यामध्ये आज एकनाथ शिंदे आमदार उदय सामंत आणि तानाजी सावंत होते. हडपसरचा कार्यक्रम उरकून हे सगळे आमदार तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी जाणार होते अशी माहिती आहे.