मयांकचे काका विष्णू सिंह यांनी त्याला अन्सारीसोबत धूम्रपान करताना शनिवारी पकडलं. त्यांनी ही बाब मयांकची आई हिनाच्या कानावर घातली. आईनं मयांकला सुनावलं. दुसऱ्या दिवशी हिना संध्याकाळी कामासाठी निघून गेल्या. त्या एका बारमध्ये गायिका म्हणून काम करतात. आई कामाला गेल्यावर मयांक अन्सारी आणि शेखला धूम्रपान करण्यासाठी भेटला.
तिघेही बाईकवरून हायेवला पोहोचले. त्यावेळी मयांकला काही संशयास्पद घडामोडी दिसू लागल्या. मला घरी सोडा, अशी विनवणी तो करू लागला. अन्सारी आणि शेख मयांकला निर्जनस्थळी घेऊन गेले. त्यांनी मयांकला चाकूनं भोसकलं. त्याचा मृतदेह त्यांनी तिथेच टाकला.
रात्री उशिरापर्यंत मयांक परत न आल्यानं विष्णू आणि हिनाचा मोठा मुलगा अजय यांनी हिनाशी संपर्क साधला. यानंतर त्यांनी मयांकचा शोध सुरू केला. सोमवारी हिनानं काशिमीरा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. त्याच दिवशी तिला मयांकच्या फोनवरून कॉल आला. मयांकचं अपहरण करण्यात आलं असून त्याच्या सुटकेसाठी ३५ लाख रुपये द्या, अशी मागणी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीनं केली.
हिनानं कॉलची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मयांकचं सिम ट्रेस केलं. ते अन्सारीकडे होतं. अन्सारीला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. अन्सारीनं शेखचा ठावठिकाणा सांगितला. त्यालाही बेड्या ठोकण्यात आल्या. अन्सारी आणि मयांक आधी शेजारी राहायचे. मात्र काही महिन्यांपूर्वी मयांक शांती पार्कमधील नव्या इमारतीत राहायला गेला. मयांकची आई शांती पार्कमध्ये फ्लॅट घेऊ शकते. याचा अर्थ तिच्याकडे खूप पैसा आह, असा अन्सारीचा समज झाला. त्यामुळेच त्यानं मयांकच्या आईकडे ३५ लाखांची मागणी केली होती.