राज्यातील जवळपास सर्वच प्रमुख महामार्गांना तसेच अंतर्गत मार्गांना खड्ड्यांचा विळखा पडला आहे. यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळेही वाहतूक खर्च सतत वाढत असल्याचे वाहतूकदारांचे म्हणणे आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम भाज्यांच्या दरावर झालेला पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे श्रावण महिना सुरू झाल्याने खवय्ये गावरान आणि रान भाज्यांना सर्वाधिक पसंती देत आहेत. वाढत्या मानवी जंगलावरील अतिक्रमणांनी रानभाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर वधारले आहेत, असे आदिवासी विक्रेत्याचे मत आहे.
घाऊक बाजारात भाज्यांचे दर १० ते २० टक्क्यांनी तर किरकोळ बाजारात ४० टक्क्यांनी वाढले आहेत. किरकोळ बाजारात भेंडी, गवार, शिमला मिरची आणि घेवडा या भाज्यांचे दर थेट शंभरी पार पोहोचले आहेत. तर ठाणे,पालघर आणि रायगड जिल्ह्यातील जंगलात मिळणाऱ्या करटोल्याच्या भाजीला सध्या बाजारात प्रति किलोला ४०० रुपयांचे दर मिळत आहे. अंबरनाथ तालुक्यातील माळरानावर या दिवसांमध्ये ९ आरी भेंडीचं उत्पादन घेतलं जातं. सर्वसाधारणपणे बाजारात मिळणाऱ्या भेंडीच्या तुलनेत या भेंडीला पांढरी झलक असते. चवीला देखील ही भेंडी वेगळी असल्यामुळे या दिवसांमध्ये पांढऱ्या भेंडीला जास्त मागणी असते. माळरानांवर कमी उत्पादन घेतल्या जाणाऱ्या या भेंडीला यंदा प्रति किलोला २०० रुपयांचे दर मिळाले आहे.