या पार्श्वभूमीवर आता शंभुराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांना प्रतिआव्हान देत ललकारले आहे. त्यांनी म्हटले की, माझ्या पाटण विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांची सभा नुकतीच पार पडली. मी त्यावेळी कामानिमित्त मुंबईत होतो. मी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आदित्य ठाकरे यांच्या सभेची माहिती घेतली. त्यावरून आदित्य ठाकरे यांची ही शिवसंवाद यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत असल्याचे दिसते.
आदित्य ठाकरे यांच्या या सभेला ५ ते ७ हजारांची गर्दी जमली होती, हे मला मान्य आहे. पण त्या सभेतील बहुतेक माणसं ही उत्तर कराड, दक्षिण कराड आणि साताऱ्यातून आली होती. या प्रत्येक भागातून माणसं आणून माझ्या पाटण मतदारसंघात मोठी गर्दी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी वेळ मागितली आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे हे माझ्या विधानसभा मतदारसंघात आले तर त्यांच्या स्वागताला मी यापेक्षा जास्त गर्दी जमवून दाखवेन. आज आदित्य ठाकरे यांच्या सभेला जितकी गर्दी होती त्याच्या ५० पट अधिक गर्दी मी जमवून दाखवेन. माझ्यात तेवढी हिंमत आहे, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले.
आम्ही नव्हे तुम्हीच बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारण केली: शंभुराज देसाई
यावेळी शंभुराज देसाई यांनी मातोश्रीवरही टीकास्त्र सोडले. आदित्य ठाकरे हे आम्ही गद्दारी केल्याचे सांगतात. पण आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जात आहोत. तुम्ही अडीच वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत बसलात,आम्हालाही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला लावलेत, ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी झालेली प्रतारण होती. हे सगळं ठाकरे परिवाराच्या सांगण्यावरून झालं होतं, असे वक्तव्य शंभुराज देसाई यांनी केले.