“चौकशी अहवाल मी मागितला असता मला दिला नाही”
तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी नेमलेल्या समितीने रणजितसिंह डिसले गुरुजींची जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर प्रतिनियुक्ती असतानाही ते तिकडे गेले नसल्याबद्दल चौकशी केली होती. त्यानंतर पुन्हा विद्यमान शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमून चौकशी केली. त्या समितीच्या मागणीनुसार डिसले गुरुजींनी खुलासा सादर केला होता. त्याचवेळी त्यांनी दोनवेळा अर्ज करून चौकशी समितीच्या अहवालाची मागणी केली होती. त्यांना तो अहवाल दिला गेला नाही. मात्र, हा अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हाच धागा पकडून डिसलेंनी झेडपी सीईओना पत्र लिहून ही खंत मांडली आहे क, “चौकशी अहवाल मी मागितला असता मला दिला नाही आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. गोपनीयतेचे नियम भंग केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी”, अशी प्रमुख मागणी डिसलेंनी पत्रातून केली आहे.
राजीनाम्यावर ८ ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासन अंतिम निर्णय घेणार
रणजितसिंह डिसले यांनी ७ जुलै २०२२ रोजी आपला राजीनामा गटशिक्षणाधिकारी माढा येथे दिला होता. प्रोटोकॉल नुसार हा राजीनामा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे आला आहे. महिन्याभरात त्यांना राजीनामा मागे घेण्यासंदर्भात निर्णय घेता येऊ शकतो. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरही डिसले गुरुजी राजीनाम्यावर ठाम आहेत. पण त्यांचा राजीनामा मंजूर होणार की नामंजूर, ते स्वत:हून राजीनामा मागे घेतील का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यावर ८ ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासन अंतिम निर्णय घेणार आहे.