डोंबिवली स्टेशन रोडवरील एका मराठी दुकानदार आणि त्याच्या दोन महिला नातेवाईकांना बाजूच्या दुकानदारांनी आणि त्यांच्या दोन मुलांनी बेदम मारहाण केली. सदर घटना पावणे दोनच्या सुमारास घडली असून आरोपीना अद्याप अटक केली नसल्याने डोंबिवलीत चाललंय तरी काय असा सवाल नागरिक करू लागले आहेत.
डोंबिवली पूर्वेला स्टेशन बाहेरील रोडवरती राजेंद्र शेलार यांचे कपड्याचे आणि इतर साहित्याचे दुकान आहे. याच दुकानाच्या बाजूला देवराज पटेल दुबरीया याचे देखील दुकान आहे. देवराज पटेल दुबरीया हे आपल्या दुकानातील कपड्याचा पुतळा शेलार यांच्या दुकानाला लावून वारंवार ठेवत होते. अनेकवेळा विनंती करून सुद्धा देवराज यांनी सुधारणा केली नाही. काल मंगळवारी परत देवराज यांनी दुकानाला लावून कपड्याचा पुतळा ठेवला. दुकानदार राजेंद्र शेलार यांनी पुतळा बाजूला हटवा असे सांगितले याच कारणावरून देवराज दुबरिया, त्यांचे दोन मुले मयूर आणि प्रितेश यांनी शेलार, त्यांच्या पत्नी सुवर्णा आणि मेव्हणी अंजना यांना बेदम मारहाण केली आहे. शेलार यांच्या दुकानातील छत्री व इतर समान घेऊन मारहाण केली. यामध्ये स्वतः राजेंद्र शेलार पत्नी सुवर्णा आणि मेव्हणी अंजना जखमी झाल्या आहेत. तर शेलार यांच्या दुकानातील सामानाचे देखील नुकसान झाले आहे.
सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून आरोपी देवराज दुबरिया, मयूर दुबरीया आणि प्रितेश दुबरीया यांच्या विरोधात रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांना विचारले असता त्यांनी सांगितलं की गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपींना अटक केली नाहीये. मात्र, याप्रकरणी सांडभोर यांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना अटक का केली जात नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. तर मराठी दुकानदार राजेंद्र शेलार यांनी आम्हाला न्याय दयावा अशी मागणी केली आहे.
गुजराती दुकानदाराने मराठी दुकानदाराला मारहाण केल्यामुळे डोंबिवली सारख्या सांस्कृतिक शहरात चाललंय तरी काय असा सवाल नागरीक करू लागले आहेत.यापूर्वीही इमारतीला गुजरातीत नाव गुजराती जैन मारवाडी लोकांनसाठी क्रिकेट स्पर्धा नॉनव्हेज खाणाऱ्या इमारतीत मराठी माणसाला घर नाही फक्त उत्तर भारतीयनसाठीच क्रिकेट सामने कोरोनाकाळात विशिष्ट धर्मियांच्या यात्रेसाठी सवलती असे प्रकार डोंबिवली सारख्या सांस्कृतिक आणि मराठमोल्या सारख्या शहरात असे प्रकार घडले आहेत.त्यातच हा प्रकार घडल्याने मराठी लोकांनवर अन्याय होतोय का असा सवाल उपस्थित होतोय.