दुष्काळ, महापूर आणि अवकाळी पावसाच्या दुष्टचक्रामुळे बळीराजा संकटात सापडला होता. अशातच शेतकरी कर्जमाफीची मागणी करण्यात येत होती. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ ची घोषणा करत शेतकऱ्यांसाठी २ लाख रूपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. परंतु आता ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप अनेक नेत्यांकडून केला जात आहे.
काही दिवसांपूर्वीच सरकारनं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ ची घोषणा केली होती. यासंदर्भातील अध्यादेश शासनानं काढला आहे. केवळ दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाच या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. तर दोन लाखांपेक्षा एक रूपयाही अतिरिक्त कर्ज असल्यास तो शेतकरी या योजनेस पात्र ठरणार नाही.