मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदार आणि खासदारांनी केलेल्या ऐतिहासिक बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत मोठं वादळ निर्माण झालं आहे. लोकप्रतिनिधींनंतर पक्षाचे पदाधिकारीही शिंदे गटात सहभागी होत असल्याने ठाकरे कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. अशातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शिवसेनेसह देशातील इतर प्रादेशिक पक्ष संपणार असल्याचा दावा करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचलं. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं सामना या आपल्या मुखपत्रातून भाजपचा जोरदार समाचार घेतला आहे.

‘नड्डा यांनी सर्व प्रादेशिक पक्षांना असा शाप दिला आहे की, भाजपच राहील व बाकीचे सगळे संपतील. मऱ्हाटीत एक म्हण आहे ती म्हणजे, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही! नड्डा साहेबांना या म्हणीचा अर्थ समजावून सांगितला पाहिजे. दुसरे असे की, भाजपने खोटा खोटा का होईना, गोवंश हत्याबंदीचा कायदा केला आहे. त्यामुळे कावळय़ाच्या शापाने प्रादेशिक पक्षांच्या गायी मरणार नाहीत. उलट गोवंश वाढतच जाईल. कावळे मात्र नष्ट होतील. शिवसेना तर वाघ आहे. त्यामुळे वाघाची झेप तुम्हाला परवडणार नाही,’ अशा शब्दांत शिवसेनेनं भाजप नेतृत्वाला इशारा दिला आहे.

संजय राऊत यांच्यानंतर ‘हे’ दोन फायरब्रँड नेते मांडणार शिवसेनेची बाजू; ठाकरेंनी सोपवली जबाबदारी

बाळासाहेबांनी केलेल्या मदतीची करून दिली आठवण

देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००२ साली झालेल्या दंगलीनंतर अडचणीत सापडले होते. मोदी यांची चहुबाजूने कोंडी झालेली असताना शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. याच मदतीची आठवण करून देत शिवसेनेनं भाजपवर हल्ला चढवला आहे. ‘संपूर्ण जग नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उभे ठाकले असताना हिंदुत्वासाठी म्हणून एकमेव बाळासाहेब ठाकरेच मोदींची पाठराखण करत होते. गुजरातमधील दंगलीचे निमित्त करून मोदींना राजधर्माची आठवण करून देणारे त्यांच्याच पक्षाचे लोक होते. तेव्हा ‘राजधर्म वगैरे ठेवा बाजूला, हिंदू धर्म म्हणून मोदींना हात लावू नका, गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उठवू नका,’ असे ठणकावून बोलणारे देशात एकमेव शिवसेनाप्रमुखच होते. त्या शिवसेनाप्रमुखांची शिवसेना संपवायला निघालेले जे.पी. नड्डा हे कोणत्या हवेत आहेत?’ असा खोचक सवालही शिवसेनेनं सामना अग्रलेखातून विचारला आहे.

उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; घेतला मोठा निर्णय

‘फुटक्या कवडीचे फुटीर लोक…’

शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या जे. पी. नड्डा यांच्यावर पलटवार करताना शिवसेनेनं आपल्या पक्षातून बंडखोरी केलेल्या नेत्यांचाही शेलक्या शब्दांमध्ये समाचार घेतला आहे. ‘महाराष्ट्रात शिवसेनेशी लढता येत नाही म्हणून त्यांनी ‘ईडी’ वगैरेंचा धाक दाखवून शिवसेना फोडली व हे फुटक्या कवडीचे फुटीर लोक खिशात ठेवून ते शिवसेनेस आव्हान देत आहेत. तुमच्या खिशातले फुटक्या कवडीचे लोक संपतील, पण बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा आकाशाला गवसणी घालेल. तुमच्या धमक्यांना भीक घालणारी शिवसेना नाही. ‘संपवू’ वगैरे भाषा तुमच्या खिशातल्या फुटक्या कवडीच्यांना करा,’ असा घणाघात शिवसेनेनं केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here