रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाची गत हळूहळू इराण व इराक यांच्यातील वर्षानुवर्षे चाललेल्या, परस्परांना रक्तबंबाळ करीत राहिलेल्या युद्धासारखी होत आहे. त्याच वेळी, चीन आणि तैवान यांच्यातील अनेक दशकांच्या संघर्षात अमेरिकेने नव्याने उडी घेतलेली दिसते. तसे नसते, तर अमेरिकेतील प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष चीनचा विरोध सपशेल डावलून तैवानमध्ये आल्या नसत्या. तैवान भेटीवर पेलोसी यांनी अनेक ट्वीट केली असून, ती सगळी चीनला लक्ष्य करणारी आहेत. तैवान व अमेरिका यांच्यातील लोकशाहीचा समान दुवा; तसेच संरक्षण सहकाराचे नवे पर्व, हे सगळे चीनसाठी आहे. चीनचे हुकूमशहा शी जिनपिंग यांनी ‘आगीशी खेळू नका आणि आगीशी खेळतात ते नाश पावतात,’ असे अत्यंत उद्दाम उद्गार अमेरिकेला उद्देशून काढले होते. या धमकीमुळे पेलोसी आपली भेट रद्द करण्याची बिलकुलच शक्यता नव्हती; मात्र ‘आम्ही हे सहन करणार नाही,’ हे चीनने केवळ अमेरिकेलाच नव्हे, तर अमेरिकेच्या मित्रांनाही सुनावले आहे. त्या मित्रांमध्ये भारतही आला. पेलोसी यांची भेट पार पडताच, तैवानला शिक्षा म्हणून चीनने तिथून होणारी फळे आणि मासे यांची आयात थांबविण्याचे ठरविले आहे. अर्थातच, हे पाऊल प्रतीकात्मक आहे. तैवानमधून चीनला प्रचंड प्रमाणात निर्यात होते. त्यातली सर्वांत मोठी निर्यात सेमी कंडक्टरची आहे. तैवान साऱ्या जगाला सेमी कंडक्टर पुरवतो. यात चीनही आला. तैवान आणि चीनचा व्यापार तैवानच्या बाजूने झुकलेला आहे आणि तैवानवर खूप दादागिरी केली, तर सारे जग आपल्यावर नाराज होऊ शकते, याची चीनला कल्पना आहे.

तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्टरिंग कंपनी; म्हणजे ‘टीएसएमसी’ ही ‘अॅपल’ला सेमी कंडक्टर पुरविते. तिच्याशिवाय ‘अॅपल’चे पानही हलू शकत नाही. तैवान आणि चीन यांच्या संभाव्य संघर्षाची पहिली दखल ‘अॅपल’ व ‘टीएसएमसी’ने घेतली. ‘तैवानला अशांत करू नका,’ हा या कंपनीचा इशारा चीनसाठीच आहे. अर्थात, केवळ ‘अॅपल’ नव्हे, तर जगातील सगळ्यांच कंपन्या तैवानवर अवलंबून आहेत. तैवानलाही याची कल्पना आहे. पेलोसी यांची भेट काही अचानक ठरलेली नाही. तैवानने या भेटीला मान्यता देऊन चीनशी उघड संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे. हा संघर्ष उद्या वाढला, तर त्याची आर्थिक झळ निश्चितच जगाला बसेल. युक्रेन प्रश्नावर रशियाच्या पाठिशी उभे राहून चीनने तैवानप्रश्नी रशियाच्या पाठिंब्याची बेगमी केली. अर्थात, रशिया हा काही आता महासत्ता उरलेला नाही. शी जिनपिंग यांना इतिहासात आपले नाव कोरून ठेवायचे असल्याने, त्यांना लवकरात लवकर तैवानला चीनच्या अधिपत्याखाली आणण्याची घाई झाली आहे; त्यामुळेच रशियाच्या आक्रमणाकडे चीनने दुर्लक्ष केले. इतकेच नाही, तर ‘उद्या आम्हीही असे करू शकतो,’ असे संदेश जगाला देण्यास कमी केले नाही.

या पार्श्वभूमीवर अमेरिकेची देशांतर्गत अर्थस्थिती चिंताजनक असली, तरी अमेरिकेने जवाहिरी याची हत्या करून; तसेच तैवानमध्ये पेलोसी यांना पाठवून जागतिक पटावरची आपली मुद्रा पुन्हा ठसठशीत केली आहे. आता चीन, रशिया, इराण आणि पाकिस्तानसारखे किरकोळ देश यांची एक नवी आघाडी आकार घेते आहे. बायडेन यांचा आखाताचा दौरा, इराणवरचे नवे निर्बंध, इस्राईलशी केलेले नवे अण्वस्त्रकरार आणि तैवानकडचे लक्ष या साऱ्या एकाच साखळीतल्या घटना आहेत. बायडेन यांनी या नव्या जागतिक स्थितीचे वर्णन, ‘एका बाजूला लोकशाही, आर्थिक स्वातंत्र्य मानणारे, उदारचरित देश आणि दुसरीकडे, हुकूमशाही आणि दडपशाहीने चालणारे देश,’ असे केले आहे. ते वरवर पाहता योग्यही आहे. तैवान हा लोकशाही देश असल्याने तो अमेरिका, युरोप आणि भारत यांचा नैसर्गिक मित्र होऊ शकतो. तैवानच्या इतिहासाचा आढावा घेतला, तर चीनशी त्याचे जैविक नाते आहे, हे नाकारता येणार नाही; मात्र एका बाजूला तैवानी समाजाला चीनच्या वरवंट्याखाली नांदायचे आहे का, हा एक प्रश्न आणि तैवानचे अत्यंत मोलाचे भौगोलिक स्थान पाहता, अमेरिका व दोस्त राष्ट्रे कधीही तैवानला चीनच्या कह्यात जाऊ देणार नाहीत. ‘एंड ऑफ हिस्टरी’ या विख्यात निबंधात (आणि नंतर पुस्तकात) फ्रान्सिस फुकुयामा यांनी आज ना उद्या जगात पाश्चात्य उदारमतवादी राज्यव्यवस्था येणार आहेत, असे भाकीत केले होते. ते गाजले. त्याचा प्रतिवादही झाला; मात्र आजची स्थिती पाहता, जग झपाट्याने महायुद्धोत्तर शीतयुद्धाच्या पर्वात प्रवेश करते आहे. शीतयुद्ध काळातील सारे प्रत्यक्ष संघर्ष हे अमेरिका व पश्चिम युरोप सोडून इतरत्र झाले. आज जगात जागोजागी संघर्षाच्या ज्वाळा पेटल्या आहेत. उद्या चीनने काही हातघाई केलीच, तर मोठा वणवाही पेटू शकतो. हे संघर्ष मर्यादेत राहण्यासाठी ‘तिसरी शक्ती’ उभी करण्याचे प्रयत्न भारताने करायला हवेत. तेच जगाच्या हिताचे ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here