नेमकं प्रकरण काय?
बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार २२ जुलैला मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात परमबीर सिंह, अकबर पठाण यांच्यासह सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत शिंदे, संजय पाटील, निरीक्षक आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, बांधकाम व्यावसायिक सुनील जैन आणि संजय पुनमिया यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस उपायुक्त निमीत गोयल यांच्या नेतृत्त्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले होते. त्यानंतर या गुन्ह्यात आरोपी असलेल्या दोन उपायुक्त, दोन सहायक पोलिस आयुक्त आणि एका निरीक्षकाची बदली सशस्त्र विभागात करण्यात आली होती. यामध्ये पराग मणेरे यांचा समावेश होता. तर गुन्हे शाखेचे उपायुक्त अकबर पठाण, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, सिद्धार्थ शिंदे आणि पोलिस निरीक्षक आशा कोरके यांची सशस्त्र विभागात बदली करण्यात आली होती. अशा परिस्थिती नेमणुकीच्या ठिकाणी कार्यरत ठेवणे प्रशासकीय दृष्टीकोनातून योग्य ठरणार नसल्याने त्यांची बदली केली जात असल्याचे आदेशात म्हटले होते.
गृह विभागाच्या नव्या आदेशात काय म्हटले आहे?
ज्याअर्थी, श्री. पराग शाम मणेरे, अपर पोलीस अधीक्षक, उत्पादन शुल्क, नागपूर यांना त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्हा नोंद क्रमांक १०५/२०२१ बाजारपेठ पोलीस ठाणे, कल्याण व गुन्हा नोंद क्रमांक १७६/२०२१ कोपरी पोलीस ठाणे, ठाणे येथे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने संदर्भाधीन क्रमांक १ येथील शासन आदेशान्वये निलंबित करण्यात आले होते. त्यांना शासन सेवेत पुनःस्थापित करण्याची शिफारस सक्षम प्राधिकारी यांना करण्यात आली होती. त्यास सक्षम प्राधिकारी यांनी मान्यता दिली आहे.
पराग शाम मणेरे, निलंबित अपर पोलीस अधीक्षक यांना त्यांच्याविरुद्धच्या दाखल गुन्ह्यांच्या प्रकरणी मा. न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून तसेच त्यांच्याविरुद्धच्या प्रलंबित विभागीय चौकशीच्या निर्णयाच्या अधीन राहून या आदेशान्वये या आदेशाच्या दिनांकापासून शासन सेवेत पुनःस्थापित करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.