CM Eknath Shinde get sick | आपल्या शरीराच्या काही मर्यादा असतात. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. राज्यात सध्या दोनच मंत्री आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री रात्री दोन-दोन वाजेपर्यंत जागतात, प्रवास करतात. आपल्याला पण देह आहे, त्याची परिसीमा आहे. त्यामुळे थोडातरी पॉझ हा घ्यावाच लागतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

हायलाइट्स:
- सततचे दौरे आणि पहाटेपर्यंत चालणाऱ्या सभा यांमुळे मुख्यमंत्र्यांना थकवा
- डॉक्टरांकडून शिंदेंना सक्त विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे
- देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत
छगन भुजबळ गुरुवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊतांवरील ईडीची कारवाई, मंत्रिमंडळ विस्तार, महापालिकेची प्रभागरचना अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पीएमएलए हा कायदा राक्षसी असल्याचे विरोधक म्हणतात. पण हा कायदा यूपीए सरकारच्या काळात तयार करण्यात आला. काँग्रेसचे सरकार असताना पी.चिदंबरम यांनीच हा कायदा बनवला होता. त्यामुळे भाजपला तरी काय नावं ठेवणार, असे भुजबळ यांनी म्हटले. येत्या ५ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल का याबाबत माहीत नाही. अनेक याचिकांची गुंतागुंत सुप्रीम कोर्टात चालू आहे, ती कशी सुटते ते बघू, असेही त्यांनी सांगितले.
ईडीच्या केसमध्ये लवकर जामीन मिळत नाही: भुजबळ
यावेळी संजय राऊत यांनी संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईबाबतही भाष्य केले. शरद पवार हे संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर गप्प आहेत, या चर्चेत काही तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते याबाबत बोलत आहेत. सुप्रिया सुळे देखील याबाबत बोलल्या. पण ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही. पण काही मार्ग निघाला तर आमच्या शुभेच्छाच आहेत, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
एकनाथ शिंदेंना डॉक्टरांकडून सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिवसभरातील सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत. सततचे दौरे आणि पहाटेपर्यंत चालणाऱ्या सभा यांमुळे मुख्यमंत्र्यांना थकवा आल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांकडून शिंदेंना सक्त विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी २० जूनला बंड पुकारल्यानंतर सुरत-गुवाहाटी-गोवा असे त्यांचे मार्गक्रमण सुरु होते. त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी भाजपसोबत सत्तास्थापन केली आणि शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवण्यात आले. ३० जूनला मुंबईत येऊन त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून त्यांचे सतत दौरे, सभा, भाषणं, पत्रकार परिषदा असे अतिव्यस्त वेळापत्रक पाहायला मिळत आहे.
दिल्लीचे दौरे असोत, पंढरपूर वारी, महाराष्ट्र दौरा यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर ताण आला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना एक दिवस सक्तीचा आराम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिंदेंनी आज एक दिवसाच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network