‘मेहबुबांच्या डीपीवर काश्मीरचा ध्वजही’
एकीकडे काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांकडून कुरबुरी सुरू असताना केंद्र सरकार मात्र यंत्रणांचा गैरवापर करण्यात व्यग्र असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. ‘चीनच्या विरोधानंतरही अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसी यांनी तैवानच्या भूमीवर पाऊल ठेवले. तैवान हा चीनचा प्रदेश असल्याच्या वल्गना फेटाळून लावल्या व अमेरिकेचे लोक तैवानमधे घुसले. चीनने अमेरिकेला इशारा देण्याशिवाय काय केले? इकडे आमच्या देशातील लडाख भूमीवर चीनचे सैन्य घुसून बसले व ३८ हजार चौरस किलोमीटर जमिनीचा ताबा घेतला. कश्मीरात फुटिरांचे झेंडे फडकले आणि आम्ही राजकीय विरोधकांवर छापेमारी व अटका करण्यातच धन्य धन्य मानीत आहोत. चीनचे सैन्य इथेच आहे व मेहबुबांच्या ‘डीपी’वर ‘कश्मीर’चा ध्वजही तसाच आहे! देशात फुटिरांचा हा असा ‘उत्सव’ सुरू आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा ‘पक्षीय’ कार्यक्रम बनला आहे. देशातील सामान्य जनता मात्र स्वातंत्र्याचे अमृत कोठे आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेनं केंद्र सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाला मेहबुबा आजही चालतात, पण हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी शिवसेना संपून जावी असा त्यांचा उद्योग आहे. कश्मीरातही ते फुटिरांनाच बळ देत आहेत व महाराष्ट्रातही ते फुटिरांनाच महाबळ देत आहेत, तेसुद्धा हिंदुत्वाच्या नावाने. यासारखे ढोंग ते कोणते? असा खोचक सवालही शिवसेनेनं केंद्र सरकारला विचारला आहे.